Karanji Ghat Accident Pudhari
अहिल्यानगर

Karanji Ghat Accident: करंजी घाटात दोन मालमोटारींचे अपघात

धोकादायक वळणांमुळे वारंवार दुर्घटना; रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी तीव्र

पुढारी वृत्तसेवा

करंजी: पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात रविवारी (दि. 12) पहाटे दोन मालमोटारींचा घाटातील वेगवेगळ्या धोकादायक वळणांवर अपघात झाला. या अपघातामध्ये पुण्याहून बीडकडे लाकडी प्लायवुड घेऊन जाणाऱ्या मालमोटारीचे ब्रेक फेल झाले.

त्यामुळे तो एका धोकादायक वळणाजवळ उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. त्याचबरोबर पाथर्डीकडून पुण्याकडे घरगुती गॅस टाक्या घेऊन जात असलेल्या मालमोटार चालकाला करंजी घाटात समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ही मालमोटार रस्त्यावर उलटल्ली.

परिणामी गॅस टाक्या रस्त्यावर पडल्या असून, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटे एकाच वेळी घाटात दोन ठिकाणी धोकादायक वळणावर झालेल्या अपघातांमुळे करंजी घाटात रविवारी दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाली. वारंवार करंजी घाटात जड वाहनांचे अपघात होत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

करंजी घाटातील धोकादायक वळणांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात करंजी घाटात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला. त्या ठिकाणी अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरुस्ती केली नाही. धोकादायक वळणांच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सातत्याने डोळेझाक केल्यामुळेच करंजी घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आणखी किती अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येणार असा प्रश्न वाहनचालकांसह प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

कल्याण-निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटात सातत्याने वाहनांचे अपघात घडत आहेत. आठ दिवसांत किमान दोन-तीन अपघात होत आहेत. असे असताना लोकप्रतिनिधी घाटाच्या दुरुस्तीकडे डोळेझाक करीत आहेत. अरुंद घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे या घाटाचे रुंदीकरण व धोकादायक वळणाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT