

निघोज: राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या घागरीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी (दि. 10) रात्री 11 वा. देवीच्या हेमाडपंथी बारवेत श्रींचे दर्शन झाले. त्यानंतर मध्यरात्री मानकऱ्यांच्या हस्ते या घागरीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 7 वा. या घागरीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाविकांनी माता मळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.
या वेळी हेमाडपंथी बारव ते मंदिर आणि पुन्हा हेमाडपंथी बारवेत या घागरीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी भाविकांनी घागरीवर पुष्पवृष्टी केली. मळगंगा मंदिर व ग्रामपंचायत चौकात घागरीवर ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली.
मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर पुजारी म्हणून मान असलेल्या गायखे कुटुंबातील सुवासिनीने घागरीचे औक्षण केले. फक्त 300 मीटर अंतर असलेल्या या मिरवणुकीला दोन तास लागले. शनिवारी (दि. 11) देवी दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.
सायंकाळी चार वाजता छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कुंडावर गेल्यानंतर तेथील यात्रा सुरू झाली. ही काठी शिखराला लागल्यानंतर कुंडाची यात्रा सुरू होत असते. दोन दिवस ही यात्रा सुरू असते. यात्रेत मनोरंजनाची साधने, मिठाईची दुकाने, तसेच शेती साहित्य मिळते.
रविवारी (दि. 12) सायं. 4 ते 7पर्यंत कुस्ती हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. या हगाम्याने या यात्रेची सांगता होत असते. रात्री गावामध्ये किरणकुमार ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. 13) शहाकादरी बाबांचा उरूस होणार असून, मंगळवारी (दि. 14) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, डॉ. आंबेडकर स्मृती संघ निघोज व मुंबई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.