Jeur Encroachment Removal Pudhari
अहिल्यानगर

Jeur Encroachment Removal: जेऊरमधील सीना नदीपात्र अतिक्रमणमुक्त; गावाला मोकळा श्वास

दीर्घकाळ रखडलेली कारवाई अखेर पूर्ण; आठवडे बाजार व यात्रोत्सवासाठी मोठी जागा उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर गावाला अतिक्रमणांनी विळखा घातला होता. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचा प्रश्न रखडलेला होता. अतिक्रमणांवरून नेहमीच गावामध्ये चर्चा, नोटिसांचा खेळ सुरू होता. परंतु प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांमधूनही नाराजी व्यक्त केली जात होती. मागील पंधरवड्यात सीना नदीपात्रातील संपूर्ण अतिक्रमण प्रशासनातर्फे हटविण्यात आले आहे. त्यामुळे सीना नदीने मोकळा श्वास घेतला असून, पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

जेऊर गावांमध्ये विविध ठिकाणी सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. सीना नदीपात्रात तर बाजारपेठ वसलेली होती. जेऊर- ससेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या दुकानांमुळे वाहतूक कोंडी व आठवडे बाजारच्या जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अतिक्रमण हटविण्याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी आदेशही दिला होता. तरीदेखील अतिक्रमण हटविले जात नव्हते. 21 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत सीना नदीपात्रातील संपूर्ण अतिक्रमण हटविण्याचा ग्रामसभेने ठराव घेतला होता.

ग्रामसभेच्या ठरावानंतर तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे, जलसंधारण यांची संयुक्तिक दोन वेळेस बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार ग्रामपंचायतला संबंधित अतिक्रमण हटविण्याबाबत आदेश देण्यात आले होते. प्रशासनाच्या भूमिकेमुळे सीना नदीपात्रातील संपूर्ण अतिक्रमण हटविले गेले आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून प्रशासनाचे कौतुक होताना पाहावयास मिळत आहे. जेऊर गावातील सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्यात आले असले, तरी अद्यापही अनेक ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे. गावांतर्गत जाणारे रस्ते, सकस आहार विहीर परिसर, जेऊर गावात जाणारा मुख्य रस्ता, वाघवाडी गावठाण, सीना नदीपात्र ते महावितरण कंपनी चौक रस्ता, बायजामाता डोंगर परिसर, साळवे वस्ती रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले पहावयास मिळत आहे.

सीना नदीपात्र ते बायजामाता मंदिर परिसरातील अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायततर्फे अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. मंगळवार (दि. 6) पर्यंत अतिक्रमण हटविण्याची मुदत देण्यात आली आहे; अन्यथा पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणांवर ग्रामपंचायतचा ‌‘बुलडोझर‌’ चालणार आहे. ग्रामदैवत बायजामाता मंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना अतिक्रमणांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याची मागणीही पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. प्रशासनातर्फे जेऊर गावांमध्ये सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम सर्व अतिक्रमण हटवेपर्यंत सुरू ठेवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. जेऊर परिसरातील सर्व शासकीय जागा मोकळ्या करून गावचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. अतिक्रमण हटवताना कोणताही भेदभाव न करता सरसकट अतिक्रमण हटविण्यात यावे अशीही अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

आठवडे बाजार अन्‌‍ यात्रोत्सवास मोकळी जागा !

अतिक्रमणांमुळे जेऊर येथे दर शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजारला जागा शिल्लक राहिली नव्हती. घाणीच्या साम्राज्यात बाजार भरवला जात होता. तसेच यात्रोत्सवालाही जागा उपलब्ध नव्हती. अतिक्रमण हटविल्यामुळे आठवडे बाजार, तसेच यात्रोत्सवासाठी मोठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT