जामखेड: पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जामखेड-नान्नज रस्त्यावरील चुंबळी शिवारात अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेऊन तब्बल 1 लाख 68 हजार 960 रुपयांचा देशी दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
जामखेड ते नान्नज जाणाऱ्या रस्त्यावर चुंबळी गावाच्या शिवारातील न्यू रशिका हॉटेल येथे तुषार जगताप हा देशी दारूची अवैध विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली. त्यानुसार या ठिकाणी तत्काळ छापा टाकण्यात आला.
छाप्यावेळी एक व्यक्ती आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तुषार विठ्ठल जगताप (वय 32, रा. शिवाजीनगर, जामखेड) असे नाव सांगितले. पंचासमक्ष झडती घेतली असता या ठिकाणी 44 सीलबंद बॉक्स देशी दारू आढळून आले.
प्रत्येक बॉक्समध्ये 48 सीलबंद बाटल्या असून एकूण दारू साठ्याची किंमत 1 लाख 68 हजार 960 रुपये असल्याचे स्पष्ट झाले. सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिस अंमलदार श्यामसुंदर अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलिस अंमलदार हृदय घोडके, श्यामसुंदर जाधव, तसेच चालक अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.