

घारगाव: पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी दि.12 जानेवारीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा विकास क्रांती सेनेसहित विविध रेल्वे कृती समित्यांनी केली आहे. या आंदोलनासाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे नियोजन बैठक झाली.
गेली अनेक वर्षांपासून आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील जनता बहुउद्देशीय पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाची अपेक्षा करत आहे. परंतु केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ‘पुण्याहून पुणतांबा’, अहिल्यानगर, शिर्डी, सिन्नर, नाशिक मार्गाची घोषणा झाल्याने स्थानिक जनतेत असंतोष वाढला.
विकास क्रांती सेनेच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पासाठी त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. आतापर्यंत दोन आंदोलने पार पडली असून आता तिसऱ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यांनी संबंधित मागण्या प्रशासन, जिल्हाधिकारी, केंद्रीय रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे देऊन पाठपुरावा केला आहे.
संगमनेर-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरून या बहुउद्देशीय रेल्वे मार्गाच्या प्रकल्पात बोटा येथे रेल्वे स्टेशन उभारण्याचीही मागणी ठेवली आहे. या प्रकल्पामुळे या भागातील कृषी व पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल, असेही बैठकीत एकमत व्यक्त झाले. येथील स्थानिक संघटनांतील पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये एकात्मता दिसून आली.
उपस्थितांमध्ये इंजिनियर संतोष फापाळे, समाजसेवक भगवानदादा काळे, सरपंच जालिंदर गागरे, सरपंच पांडुरंग शेळके, सुहास वाळुंज, संभाजी बोडके,स्वप्नील हुलवळे, गणेश हुलवळे ,किशोर फापाळे, राहुल ढेंबरे, मुनीर शेख, चंद्रकांत गोंदके, शेखर काळे, रमेश आहेर, पूजाताई सोनवणे, पत्रकार सतीश फापाळे आदी उपस्थित होते.