

नगर: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. मतदान केंद्रावर काम करणाऱ्या सुमारे 1800 कर्मचाऱ्यांना सोमवारी शहरातील एक मंगल कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे व उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. दरम्यान, दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील एका कार्यालयात मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात महापालिकेसाठी 345 मतदान केंद्र असून, त्यासाठी आज 1800 कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले. त्यात मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंडे यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिराला निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. अनेकांनी प्रशिक्षणासाठी दांडी मारली आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नोटिसा पाठविल्याचे समजते. दरम्यान, महानगरपालिकेला मतदान प्रक्रियेसाठी 800 कंट्रोल युनिट, 1600 बॅलेट युनिट (ईव्हीएम) उपलब्ध झाले आहेत. मेमरी कार्ड, पॉवर बँकही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्याची तपासणी केली जात आहे.
ईव्हीएम हातळण्याचे प्रशिक्षण
मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण पार पडले. त्यात मदान प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. आता दुसऱ्या प्रशिक्षणाच्यावेळी तज्ञ प्रशिक्षकांद्वारे ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
महापालिका निवडणुकीसाठी थेट बूथवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी 1800 कर्मचारी हजर होते तर, अनेक कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर कर्मचाऱ्यांवर निवडणूक आयोगानुसार कारवाई करण्यात येणार असून, त्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्याचे सहायक आयुक्त महेर लहारे यांनी सांगितले.