

कोळगाव: श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी गावात ग्रामपंचायतीचा सायंकाळी सात वाजता भोंगा वाजतो. त्यानंतर गावातील सर्व मुले मोबाईल व टीव्ही बंद करून अभ्यासाला बसतात. सरपंच उज्ज्वला राहुल आढाव यांच्या या उपक्रमाची पालकांमध्ये जोरदार चर्चा आहे.
सरपंच आढाव यांनी गावातील मुलांना अभ्यासाची सवय लागावी, मोबाईलचे व टीव्हीचे वेड बाजूला ठेवून शिकून मोठे व्हावे, अधिकारी, पदाधिकारी व्हावे, या उद्देशाने ही अभिनव उपक्रम राबविण्याचा निश्चय केला. त्यानुसार ग्रामपंचायतीचे कर्मचारी दररोज सायंकाळी सात वाजता भोंगा वाजवतात. सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी प्रत्येक घरी जाऊन अभ्यास करण्याविषयी जनजागृतीही करतात. पालकांना अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगतात. मुलांकडील व पालकांकडील मोबाईल आणि टीव्ही बंद करतात.
घराबाहेर खेळत असणारी मुले अभ्यासासाठी बसवितात. दररोज काही घरांना समक्ष भेटी दिल्याने पालकांमध्येही जनजागृती निर्माण झाली असून, त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे गावात अभ्यासाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुले एक तास अभ्यास करतात. परंतु 1 जानेवारीपासून सायंकाळी सात ते नऊ अशी अभ्यासाची वेळ ठरवून दिली जाणार आहे, असे सरपंच आढाव यांनी सांगितले.
सरपंच उज्ज्वला आढाव यांना उपसरपंच संदीप ननवरे, ग्रामपंचायत सदस्य अंजाबापू कवाष्ठे, सविता विष्णू नवले, शितल भाऊसाहेब लोंढे, मेहबूबी दाऊद सय्यद, सुप्रिया आढाव, ग्रामसेवक स्वप्नील आंबीटकर, ग्रामपंचायत कर्मचारी सूर्यकांत आढाव, भाऊसाहेब लोंढे, गणेश आढाव व चैतन्य लोंढे हे सहकार्य करीत असून, हे गाव मुख्यमंत्री समृद्ध गाव या योजनेमध्येही समाविष्ट आहे. त्यामुळे गावात अनेक सुधारणा चालू आहेत, अशी माहिती सरपंच आढाव यांनी दिली.
मुलांना उच्च शिक्षित करण्याचा ध्यास
सरपंच उज्ज्वला आढाव यांनी प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन पुढे उच्चशिक्षण पूर्ण केले. त्या एमबीए झालेल्या आहेत. गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासासाठी प्रेरित करीत आहेत. शिक्षणापासून कोणीही वंचित न राहता सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. त्यातून अधिकारी निर्माण होऊन जबाबदार नागरिक म्हणून गाव आदर्श केले पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे.