

ढोरजळगाव: दुष्काळ पाचवीला पूजलेला व एकेकाळी पिण्याचे हंड्याने आणणाऱ्या ढोरजळगाव परिसराचा ढोरा नदीवरील बंधाऱ्यांच्या मालिकांमुळे चेहरामोहरा बदलून गेला आहे. बागायती क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे.
शेवगाव तालुक्याच्या पश्चिमेला असणारा ढोरजळगाव परिसर हा बारमाही दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. पर्जन्यछायेच्या प्रभावाखाली येत असल्याने पूर्वी पर्जन्यमान देखील कमी असायचे. परिणामी शेतकऱ्यांची बाजरी, मठ, मूग, तर रब्बी हंगामात ज्वारी या पिकांवर प्रामुख्याने भिस्त होती. या परिसराला ज्वारीचे आगार म्हणूनही ओळख होती. 1972 च्या दुष्काळानंतर दरवर्षी शेतकरी हे रोजगार हमीच्या कामावर जात असत. काळी कसदार सुपीक जमीन, उशाला ढोरा नदी मात्र नदीला आलेले पाणी वाहून जात होते. त्याचा काडीमात्र उपयोग होत नव्हता. अशातच 2011 मध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेत तत्कालिन आमदार चंद्रशेखर घुले यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना ढोरा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला मंजुरी आणली.
2012 मध्ये या बंधाऱ्याचे उद्घाटन होऊन परिसरातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली आले. 2019 मध्ये भाजपचे तत्कालीन तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर यांनी पाठपुरावा करून आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष बाब म्हणून मलकापूर येथील बंधाऱ्याला मंजुरी आणली. या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे ढोरजळगाव-शे, ढोरजळगाव-ने, मलकापूर, गरडवाडी परिसरातील 5 ते 6 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यामुळे परिसरात उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली, अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले. कपाशीसारख्या नगदी पिकांना देखील प्राधान्य देऊ लागले. आज मितीस ढोरा नदीच्या दुतर्फा असणाऱ्या ढोरजळगाव-शे, ढोरजळगाव-ने ,गरडवाडी, मलकापूर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसलागवड झाल्याने ऊस तोडणीसाठी ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, गंगामाई ,प्रसाद शुगर, केदारेश्वर, स्वामी समर्थ कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस जात आहे.
लाखो रुपये आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होत आहेत. येथील शेतकरी हा कांदा पिकाला देखील प्राधान्य देत असून मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येऊ लागला आहे. ऊस व कांद्यामुळे कपाशीच्या क्षेत्रात देखील घट झाली आहे. मोठ्या प्रमाणावर दूध धंदयाकडे शेतकरी वळले असून. एकेकाळी काळी कसदार जमीन असूनही खाण्याची भ्रांत असणाऱ्या शेतकरी कुटुंबांकडे आज घरोघरी चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, महागड्या दुचाक्या असून, छपरांच्या जागी आज टुमदार बंगले दिसत आहेत.
बंधारे खोलीकरणासह रुंद करा
जलसंधारणामुळे जमिनीचे भाव देखील गगनाला भिडले आहेत, उद्योग व्यवसायांमध्ये वाढ झाली आहे, ही सारी किमया बंधाऱ्यामुळे झाली असली तरी पाहिजे तेवढा पाण्याचा साठा होत नाही. यासाठी बंधाऱ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.