शशिकांत पवार
नगर तालुका : नगर तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये विविध औषधी वनस्पतींचा खजिना आढळतो. तालुक्यातील वनविभागाचे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र, तसेच आर्मीचे बाराशे हेक्टर क्षेत्र तर खासगी डोंगररांगा मोठ्या प्रमाणात आढळतात. डोंगररांगांनी दुर्मिळ अशा विविध औषधी वनस्पती आढळून येतात. परंतु ’डेव्हलपमेंट’ च्या नावाखाली बेसुमार होत असलेल्या झाडांची कत्तल औषधी वनस्पतींच्या मुळावर उठली आहे. (Latest Ahilyanagar News)
तालुक्यात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पती नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. शेताच्या बांधावर सर्रासपणे आढळणाऱ्या झाडांवर देखील कुऱ्हाड चालविली गेल्यामुळे शेतकऱ्यांना सावली देणारे विविध झाडेदेखील नष्ट झाले आहेत. पूर्वी शेताच्या बांधावर बकाण, रामकाठ, गोंधण, बाभळ, कडूलिंब, चिंच, आंबा, उंबर याबरोबर विविध जातींच्या झाडांची सर्रासपणे सावली दिसून यायची. शेतकऱ्यांसाठी बहुगुणी असणाऱ्या या वृक्षांच्या सावलीतच बळीराजा विसावा घेत होता. परंतु शेती विकसित करण्याच्या नावाखाली सर्रासपणे बांधावरील झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे बकाण, रामकाठ, गोंधण, टाकळ, भोकर याबरोबर बहुसंख्य झाडे दुर्मिळ होत गेली आहेत.
गर्भगिरीच्या डोंगर रांगांमधील कड्याकपारीमध्ये येणाऱ्या खैरांच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. खैराचे झाड हे औषधी तसेच बहुगुणी म्हणून ओळखले जाते. परंतु मोठ्या प्रमाणात खैराच्या झाडावर देखील कुऱ्हाड चालविण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील खैरांच्या झाडांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तसेच नव्याने खैरांच्या झाडांच्या लागवडीबाबत गावपातळी तसेच शासन स्तरावर लागवडीसाठी मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
खैर भारतातील अत्यंत उपयुक्त आणि बहुगुणी झाड आहे. खैराचे झाड हे आर्थिकच नाही, तर औषधी, पर्यावरणीय आणि औद्योगिक दृष्ट्यादेखील अतिशय मौल्यवान आहे. खैराच्या झाडापासून कात तयार केला जातो. चमड्याच्या उद्योगात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अतिरेकी तोड, हवामान बदल आणि दुर्लक्षामुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या झाडाला काही ठिकाणी पवित्र वृक्ष म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागात खैराच्या झाडाच्या काड्या दात घासण्यासाठी वापरल्या जातात.
खैराच्या झाडाचे जतनव संवर्धन करण्यासाठी वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे. शासनाच्या वतीने, तसेच गावपातळीवर खैरांच्या झाडाची लागवड, संवर्धन मोहीम राबविली गेली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांच्या बांधांवर सर्रासपणे आढळणारे झाडेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या झाडांच्या लागवडीसाठी गावपातळीवर चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.
आयुर्वेदात प्रसिद्ध असणारा कात बनविण्यासाठी, तोंडाचे रोग, घसा दुखणे, जखमा, अतिसार, साल ः जंतूनाशक, रक्त शुद्धीकारक, तसेच तोंडातील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचा काढा दात दुखी व घशातील संसर्ग यावर उपयुक्त आहे. शुष्क प्रदेशात वाढणारे झाड असल्याने जमिनीचे धूप थांबवते. लाकूड टिकाऊ, कठीण, सुंदर असल्याने फर्निचर, बांधकाम शेतीच्या उपकरणासाठी उपयुक्त मानले जाते.
खैर, बाभूळ, शिसव, अर्जुन, बेहडा, हिरडा, आंबा ( जंगली), उंबर, पिंपळ, शेर, गोंधण, रामकाठ अशा विविध प्रकारची झाडे पूर्वी शेताच्या बांधावर सर्वत्र आढळून येत होती. परंतु आता ती दुर्मिळ होत चालली आहेत. जी झाडे गावाला ओळख देत होती ती आता आठवणीतच उरली आहेत, असे सरपंच परिषदेच्या राज्य कोअर कमिटेीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.
तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये विविध औषधी वनस्पती आढळतात. जंगलातील मानवी हस्तक्षेप कमी झाल्यास जंगलाची वाढ मोठ्या प्रमाणात होईल.शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरील झाडे तोडू नयेत. दुर्मिळ होत असलेली झाडे लागवड व संवर्धन मोहीम वन शविभागाच्या सहकार्याने गावपातळीवर राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी वनविभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.मनेष जाधव, वनरक्षक, वनविभाग