

कोपरगाव : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुपूत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आयोजित शिवमहापुराण कथा सोहळ्यात, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राजकीय मतभेद दूर ठेवून, अनपेक्षितरीत्या हजेरी लावून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. (Latest Ahilyanagar News)
विशेष उल्लेखनिय बाब अशी की, या व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे व धनश्री विखे या सासू- सुनबाईसोबत स्नेहलता कोल्हे यांनी हसत फुगडी खेळून आनंद लुटला! या पार्श्वभूमीवर, ‘विखेंच्या कार्यक्रमात कोल्हेंची हजेरी,’ ही बातमी जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. मध्यप्रदेशातील शिवभक्त प्रवचनकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला अस्तगाव माथा (ता. राहाता) येथे गर्दीचा महासागर दाटला. (दि. 14 ते 16 ऑक्टोबर)पर्यंत हा दिव्य सोहळा पार पडला. कार्यक्रम सांगताप्रसंगी (16) रोजी स्नेहलता कोल्हे आवर्जून उपस्थित होत्या.
2019 मध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या माध्यमातून थेट विधानसभा गाठणाऱ्या स्नेहलता कोल्हे यांनी, पाच वर्षांच्या सत्ता कालावधीत कोपरगाव मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू केले, मात्र 2024 च्या निवडणुकीत अल्प फरकाने त्यांचा पराभव झाल्यामुळे विखे-कोल्हे यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हे - विखे यांच्या एकत्र उपस्थितीकडे राजकीय वर्तुळात अनेक अर्थांनी पाहिले जात आहे.
यापूर्वीही स्नेहलता कोल्हे यांनी, वैजापूर येथील शिवमहापुराण कथेस हजेरी लावली होती. यानंतर अस्तगाव, राहाता येथील कार्यक्रमात त्यांनी पुन्हा सहभाग घेतला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या सोहळ्याचे व्यवस्थापन कौशल्याने हाताळून बाजी मारली. शिव महापुराण कार्यक्रमासाठी लाखो शिवभक्तांनी हजेरी लावली. धार्मिक व सांस्कृतिक वातावरण पाहून भाविक भारावले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुपूत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आयोजित शिवमहापुराण कथा सोहळ्यात, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित राहून, विखे सासू- सुनेसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. यानिमित्त कोल्हे यांनी दिलेला एकतेचा संदेश अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक नवा अध्याय मानला जात आहे.
कोपरगावः विखे पाटील आयोजित शिवमहापुराण कथा सोहळ्यात, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी, राजकीय मतभेद दूर ठेवून, विखे सासू-सुनेसोबत फुगडी खेळून आश्चर्याचा धक्का दिला.