

अहिल्यानगर : मुदत संपल्यानंतर अजूनही अहिल्यानगर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झालेली नाही. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दाखल तक्रारीची दखल घेत आयोगाने नगरविकास विभागाकडे सविस्तर अहवाल मागविला आहे. (Latest Ahilyanagar News)
उबाठा सेनेचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे आणि सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. शेख यांची तक्रार आयोगाने नगरविकास विभागाकडे पाठविली आहे. तर अंतिम प्रभाग रचना करताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या काळे यांच्या तक्रारीवर आयोगाने राज्याच्या नगरविकास विभागाकडे सविस्तर अहवाल मागविला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यावर हरकती आल्यानंतर त्याची सुनावणी घेत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी नगरविकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. 13 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणे अपेक्षित होते, पण ती तारीख उलटून गेल्यानंतर अजूनही अंतिम प्रभाग रचना जाहीर झालेली नाही.
आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून नैसर्गिक प्रभाग तोडून गैरसोयीचे तयार करण्यात आले. हद्दही स्पष्टपणे नमूद करण्यात आली नसल्याने प्रारूप प्रभागरचना रद्द करावी, अशी शेख यांची मागणी आहे. तर काळे यांनी प्रभाग रचना करताना पारदर्शक पद्धतीने केली नसल्याने ती रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्याची मागणी केली आहे. काळे यांच्या तक्रारीवर आयोगाने नगरविकास विभागाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.
पारदर्शक पद्धतीने राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेत नव्याने प्रभाग रचना करण्यात यावी. जुनी प्रारूप प्रभाग रचना रद्द करण्यात यावी. आयुक्त तथा प्रशासक नव्याने नियुक्त करण्यात यावा.
किरण काळे, शहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे)
राजकीय द्वेषापोटी विरोधकांचे प्रभाग बेकायदेशीरपणे तोडले आहेत. दाखल 39 हरकतींवर दोन तासांत सुनावणी झाली. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार बाजू मांडण्याची संधी दिलेली नाही. प्रारूप रचनेत गोपनीयतेचा भंग झाल्याने ती रद्द करून नव्याने प्रारूप प्रभाग रचना करण्यात यावी.
शाकीर शेख, सामाजिक कार्यकर्ता