

नगर तालुका : नगर तालुक्यातील जेऊर-इमामपूर वहिवाट रस्ता काही वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. रस्त्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते. परंतु या विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.(Latest Ahilyanagar News)
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना 25 जुलै रोजी पत्र दिले होते. पत्र देऊन वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल मागवला होता. परंतु बांधकाम विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आल्या नसल्याचा आरोप होत आहे.
जेऊरमधून इमामपूरकडे जाण्यासाठी काळकाई माता मंदिरापासून खोल ओढा रस्ता वापरात होता. रस्त्यावर घुरुडी डोंगराच्या पायथ्याला खोल ओढा असल्याने रस्त्याला ’खोल ओढा’ रस्ता म्हणूनच ओळखले जात होते. ब्रिटिशकाळा पूर्वीपासून सदर रस्ता इमामापूर, शेटे वस्ती, लिगाडे वस्ती, तोडमल वस्तीवरील नागरिकांना वापरासाठी हाच एकमेव रस्ता अस्तित्वात होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर रस्त्यावर अतिक्रमण व काही ठिकाणी रस्ता बंद करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून मोठा वळसा घालत प्रवास करावा लागतो. हा प्रवास शालेय विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेऊर येथील आठवडे बाजारसाठी शेतकरी, शिक्षणासाठी विद्यार्थी, तसेच ग्रामदैवत बायजामाता देवीच्या कावडीधारक व्यक्तींसाठी हा रस्ता अनेक वर्षे वापरात होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून सदर रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे सदर रस्त्याची मोजणी करून डांबरीकरणाची मागणी करण्यात येत आहे. स्त्याच्या कामाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.