नगर: जिल्ह्यातील प्रस्थापितांनी एकत्र येत जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधाचा घाट घालताना विस्थापितांना दूर ठेवले. त्यामुळे विस्थापितांनी उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखलनंतर माघारीपर्यंत त्यावर खल होणार असल्याने बँकेची निवडणूक होणार की नाही?, बिनविरोध झाल्यास विस्थापितांना काय मिळणार, झाल्यास विस्थापितांच्या पॅनलमध्ये कोण कोण जाणार, याची उत्सुकता लागून आहे.
सर्वच तालुक्यात सोसायटीसह अन्य सात जागांवर तुल्यबळ उमेदवारांची विस्थापितांकडून शोधाशोध सुरू झाली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार अमोल खताळ यांची कान उघडणी केल्याची चर्चा आहे. यामुळेच लंघे यांनी पत्नी रत्नमाला यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात संगमनेरातही अमोल खताळ यांनी उमेदवाराची शोधाशोध सुरू केल्याचे समजते. पाथर्डीतून ऋषिकेश ढाकणे, कडूचंद शेटे या दोघांपैंकी एकाला विस्थापितांकडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जाते.
अहिल्यानगर तालुक्यातून बाळासाहेब हराळ यांच्याशिवाय काँग्रेसचे प्रताप शेळके यांचाही अर्ज सोमवारी भरण्याची तयारी सुरू आहे. पारनेरात स्वतः नीलेश लंके यांनी यापूर्वीच अर्ज भरला आहे. कर्जत जामखेडमध्ये विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या भूमिकेवरच प्रस्थापित आणि विस्थापित यांचे गणित अवलंबून आहे. श्रीगोंद्यात राहुल जगताप हे सज्ज आहे. कोपरगाव आणि राहुरीत विरोधी गटाकडून सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. राहात्यातून प्रभावती घोगरे यांचा अर्ज भरून घेतला जाण्याची चिन्हे आहेत. श्रीरामपुरातून भानुदास मुरकुटे यांच्यासाठी विस्थापित नेते आग्रही आहेत. अकोलेत आमदार डॉ. किरण लहामटे, अमित भांगरे यांची मदत घेण्याचा विस्थापितांचा प्रयत्न असल्याचे राजकीय समीकरण मांडले जात आहे.
शेवगावमधून घुलेंविरोधात मुंडे?
शेवगाव सोसायटी मतदार संघात चंद्रशेखर घुले आणि राजश्री घुले यांचे उमेदवारी अर्ज आले आहेत. घुले यांची सहकारातील ताकद मोठी आहे. मात्र, शिवसेनेकडून अरूण मुंडे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना संपर्क प्रमुखांकडून असल्याचे समजते. शिसेनेला दूर ठेवून प्रस्तापितांची सुरू असलेली हालचाल पाहता शिवसेनेकडून ठिकठिकाणी अर्ज भरून घेतले जात आहेत. शिवसेना प्रत्यक्षात निवडणूक लढविणार की जागांची वाटाघाटी करणार याचे उत्तर अर्ज माघारीनंतरच मिळणार आहेत.
कर्जतमध्ये शिंदे की गुंड?
तिसऱ्या टर्मच्या नियमाने अंबादास पिसाळ यांना कर्जत सोसायटीतून थांबावे लागू शकते. त्यामुळेच त्यांनी सुपूत्र तुषार पिसाळ यांचा उमेदवार अर्ज भरून ठेवला आहे. कर्जतमधून प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा ठराव आहे. त्यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा राजेंद्र गुंड यांनी महिला राखीव मतदार संघातून पहिला उमेदवारी अर्ज भरलेला असताना, गुरुवारी पुन्हा कर्जत सोसायटीतूनही अर्ज दाखल केला. त्यामागे सभापती प्रा. शिंदे असल्याची चर्चा आहे. कर्जतमधून सभापती शिंदे सोमवारी अर्ज दाखल करून लढणार की गुंड यांना उमेदवारी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.
श्रीरामपुरात ससाणे-मुरकुटे लढत कोणाला हवी?
ओबीसी मतदार संघातून उमेदवारी दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण जयंतराव ससाणे यांनी सोसायटीतूनही अर्ज भरला आहे. त्यामुळे ससाणेंना ओबीसी की सोसायटीतून संधी हवी, हा प्रश्न आहे. पॅनल करताना जागांची सरकासरकी होऊन ससाणेंना सोसायटीत उमेदवारी मिळालीच तर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे काय..? हा प्रश्न आहे. अशावेळी सध्या विस्थापितांच्या गटात गणले जाणारे मुरकुटे आणि प्रस्थापितांचे ससाणे यांच्यात लढत होऊ शकते का, याविषयीही आडाखे बांधले जात आहे. श्रीरामपुरात दोन्ही गटाकडे तुल्यबळ ठराव आहेत. आदिक आणि विखे गटाकडेही ‘निर्णायक’ ठराव आहेत. त्यामुळे ससाणे-मुरकुटे लढत कोणाला हवी आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. ससाणे-मुरकुटे यांच्याकडून ‘आम्ही एकत्रच आहोत’ असे सांगण्याचा प्रयत्न असला तरी, ते वेगळवेगळ्या प्रवाहात असल्याचेही पदोपदी दिसून येते.
राहुल जगताप चालवणार स्वतःचा अजेंडा
गत लोकसभा निवडणुकीत थोरातांच्या सांगण्यावरूनच श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी नीलेश लंके यांचे प्रामाणिक काम केल्याचा दावा जगताप समर्थक करतात. त्यामुळेच लंके यांना श्रीगोंद्यातून मताधिक्य मिळाले. जगताप यांना त्याची किंमत राजकीय पटलावर वेळोवेळी मोजावी लागली. विधानसभा निवडणुकीवेळी राहुल जगताप यांच्या उमेदवारीसाठी थोरातांनी पठबळ दिले, ना लंकेंनी पक्षाकडे शब्द टाकला. उलट, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीची हक्काची जागा शिवसेनेसाठी सोडावी लागली. शिवसेनेने नागवडेंना तेथून उमेदवारी दिली. थोरात आणि लंके यांच्या भूमिकेचे शल्य आजही जगताप समर्थक (नगर तालुक्यातील) खासगीत बोलून दाखवतात. जगताप यांच्या कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्ती आल्यानंतरही हेच ‘नेते’ पाठीमागे उभे राहिले नाहीत. त्यामुळे आता बँकेच्या निवडणुकीतही थोरात असो किंवा लंके किंवा अन्य कोणी (विखे), यांच्यापासून दूर राहून राहुल जगताप स्वतःचा स्वतंत्र अजेंडा चालविण्याच्या मानसिकतेत असल्याचे सांगण्यात येते. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशी जगताप यांचे सख्य असले तरी आता जगताप हे स्वत:च निर्णय घेण्याच्या मानसिकेतत असल्याचे समर्थक सांगतात.