

राहुरी: मानोरी, मांजरी, डिग्रस आणि वांजुळपोई परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांची मागणी तसेच आ. प्राजक्त तनपुरे आणि आ. अक्षय कर्डिले यांच्या मागणीचा विचार करून जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार काल शुक्रवारी (दि. २) सकाळी ९.२० वाजता मुळा धरणाचे ११ वक्राकार दरवाजे उघडले. तब्बल २ हजार ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडले. शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पडली.
धरणातून सुटलेली पाण्याची धार आता चारही कोल्हापुरी बंधाऱ्यांकडे झेपावत आहे. हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर परिसरातील तब्बल ३ हजार १२३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. चारही बंधाऱ्यांची एकत्रित पाणी साठवण क्षमता सुमारे २२० दशलक्ष घनफूट असून बंधारे भरण्यासाठी धरणातून सुमारे ५०० दशलक्ष घनफूट पाणी खर्च होणार आहे. सुमारे ५० तास पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
रब्बी हंगामाच्या तोंडावर बंधाऱ्यांमध्ये पाणी साठणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांच्या वाढीसाठी आणि आगामी हंगामाच्या नियोजनासाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची पालवी फुटली आहे. मात्र, हा दिलासा किती काळ टिकणार, हा प्रश्नही त्याचवेळी उभा राहिला आहे. कारण एका बाजूला शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागविण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला धरणाच्या पोटातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.
यंदाच्या हंगामात मुळा धरणात तब्बल १९ हजार ३५ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणात २० हजार ५०० दलघफू म्हणजेच ७८.८४ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, डावा व उजवा कालवा, वांबोरी चारी आणि आता चार कोल्हापुरी बंधारे भरण्यासाठी होणारा पाण्याचा वापर यामुळे साठ्यावर सातत्याने ताण येत आहे. आतापर्यंत डाव्या कालव्यातून ८७०.३० दलघफू, उजव्या कालव्यातून ५ हजार १७५.६६ दलघफू, तर वांबोरी चारीसाठी २११.२३ दलघफू पाणी सोडले आहे. आता चार बंधारे भरण्यासाठी आणखी सुमारे ५०० दलघफू पाण्याचा वापर होणार आहे.
आज पाण्याची गरज भागविण्यासाठी धरणातून पाणी सोडले जात आहे; मात्र प्रत्येक आवर्तनासोबत धरणातील साठ्याची पातळी खाली सरकत आहे. त्यामुळे आजचा दिलासा आणि उद्याची चिंता असे विरोधाभासी चित्र निर्माण झाले आहे. पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची झळ अधिक तीव्र झाली आहे. खरीप हंगामाच्या अनिश्चिततेनंतर आता शेतकऱ्यांच्या नजरा रब्बीच्या पाण्याकडे लागल्या आहेत. अशा वेळी बंधारे भरण्यासाठी मिळणारे पाणी म्हणजे शेतीसाठी संजीवनी ठरणार आहे.
मात्र, पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना वाढत्या मागण्या आणि विविध सिंचन योजनांमध्ये पाण्याचे नियोजन करणे जलसंपदा विभागासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. आज बंधारे भरत असले, तरी उद्या धरणातील साठा किती शिल्लक राहणार, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून नियोजनानुसार मुळा धरणातून २ हजार ५०० क्युसेकने पाणी सोडले आहे. चारही बंधारे भरल्यानंतर संबंधित परिसरातील ३ हजार १२३ हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी त्याचा फायदा होईल. पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करावा, असे आवाहन उपविभागीय अभियंता विलास पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
मुळा धरणातून सुटणारी पाण्याची प्रत्येक धार सध्या हजारो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. डावा आणि उजवा कालवा सुरू आहे. वांबोरी चारीलाही पाणी देण्यात आले आहे. आता मानोरी, मांजरी, डिग्रस आणि वांजुळपोई परिसरातील चार कोल्हापुरी बंधारे भरण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडले आहेत.
आवर्तन कात्रीत सापडण्याची धास्ती
मुळा धरणातील साठा सातत्याने कमी होत असल्याने यंदाचा उन्हाळा शेतकऱ्यांसाठी अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात पिकांसाठी मिळणारे अतिरिक्त आवर्तन पाण्याच्या उपलब्धतेच्या कात्रीत सापडण्याची धास्ती निर्माण झाली आहे. धरणातील साठा पुरेसा न राहिल्यास उन्हाळी अतिरिक्त आवर्तनावर मर्यादा येऊ शकतात. परिणामी उन्हाळी पिकांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता असून त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे रब्बीला मिळणारा आजचा दिलासा उद्याच्या उन्हाळ्याचे गणित अवघड करणारा ठरू नये, यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे.