

नगर: जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. थोरात-विखेंच्या संगमनेरातील बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या तसेच धास्तीनेही गांगरले. त्या बैठकीच्या पुढे काय? याची उत्सुकता असतानाच शनिवारी (दि. ३) नवीन राजकीय घडामोड समोर आली. सोनईत थोरात-विखे-गडाखांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत जिल्हा बँकेचे आगामी राजकीय गणित सेट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा बँकेचे राजकारण नेहमीच माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याभोवताली फिरत आले. राजकीय जोडे बाजूला ठेवत विखे-थोरात व गडाखांनीही सहकार जपला. नेहमीच एकमेकांविरोधात लढणारे थोरात-विखे यांच्यात यंदा ऐतिहासिक समझोता झाला अन् एकोप्याच्या दिशेने पावले पडली. संगमनेरातील थोरात-विखे भेटीने मात्र जिल्ह्यात गहजब उडाला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या जाणत्या नेत्यांच्या गाठीभेट घेत राज्याच्या राजकारणातील उच्च पदस्थ प्रा. राम शिंदे कमालीचे सक्रिय दिसले; पण ‘समझोता’ बैठकीपासून दूर राहिलेले शिंदे आता विस्थापितांच्या मोटबांधणीसाठी सरसावले आहेत. प्रा. शिंदे यांच्याकडे सहकारातील नसला, तरी राजकीय पटावरील अनुभव मोठा आहे. त्यादृष्टीने ते हाल‘चाली’ करत आहेत.
थोरात-विखे-गडाख यांच्याकडे सहकारातील अनुभवी व तितकेच संवेदनशील नेतृत्व म्हणून पाहिले जाते. शनिवारी हे तिघे सोयरे नेते एकत्र आले. सोनईतील ‘आमराई’त या तिघांचा जिल्हा बँकेच्या राजकारणावर दीड तास खल झाला. या बैठकीत तिघांशिवाय चौथा कोणीच नसल्याने नेमकी माहिती समोर येत नसली, तरी जिल्हा बँक सत्तेच्या पायाभरणीचे गणित मांडत ते सेट केल्याचा आडाखा बांधला जात आहे.
सोनईतील भेटीत नेमके काय ठरले, बिनविरोधच्या वाटेवरील चर्चा की निवडणूक लढण्याची रणनिती, हे समोर यायला माघारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ५) त्याचा आदमास अनेकांना आल्यावाचून राहणार नाही. तोपर्यंत जो तो ज्याच्या-त्याच्या परीने आडाखे बांधणार हे मात्र नक्की!
... म्हणून तर एकत्र नाहीना?
विस्थापित गटाकडून थोरात-विखे-गडाखांविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची चाचपणी सुरू आहे. सहकारातील मुरब्बी तिघेही ही गोष्ट जाणून आहेत. त्यामुळेच हे तिघे एकत्र तर आले नसतील ना, अशीही अटकळ बांधली जात आहे. हे तिघे एकत्र आले तर स्वहित न बघता ते जिल्हा बँकेचे हित समोर ठेवून राजकीय सारीपाट मांडतील हे सांगायला कोणा भविष्यकाराची गरज नाही.