Jamkhed Robbery: नान्नजमध्ये मध्यरात्री धाडसी दरोडा; बाळाला पायाखाली घेण्याची धमकी देत १४.६३ लाखांचा ऐवज लंपास

महिलेच्या गळ्याला कोयता लावून कुटुंबीयांना धमकावले; चार मुखवटाधारी चोरट्यांकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास
Jamkhed Robbery
Jamkhed RobberyPudhari
Published on: 
Updated on: 

जामखेड: तालुक्यातील नान्नज येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करून कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवत तब्बल १४ लाख ६३ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी महिलेच्या गळ्याला कोयता लावून तसेच चार महिन्यांच्या बाळाला पायाखाली घेण्याची धमकी देत कुटुंबीयांना गप्प केले. या घटनेमुळे नान्नज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Jamkhed Robbery
Ahilyanagr Marriage Fraud: लग्नासाठी ४ लाख घेतले; महिनाभरातच वधूची फसवणूक उघड, राहुरीत खळबळ

शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर, मदरसा परिसर, नान्नज येथील रहिवासी मनिषा श्रीमंत गोरे (वय ४६) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मनिषा गोरे या आपल्या चार महिन्यांच्या जुळ्या नातवंडांपैकी एका बाळासोबत बेडरूममध्ये झोपल्या होत्या. त्यांचे पती श्रीमंत गोरे, मुलगा अक्षय, सून प्रतीक्षा आणि दुसरे जुळं बाळ दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने मनिषा गोरे यांना जाग आली. त्याचवेळी दरवाजाची कडी तोडून तोंडाला मास्क लावलेले चार चोरटे घरात शिरले.

Jamkhed Robbery
Ahilyanagr Mula Dam: मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले; २,५०० क्युसेकने पाणी सोडले, ३,१२३ हेक्टरला सिंचनाचा लाभ

चोरट्यांनी आरडाओरड करू नये म्हणून मनिषा गोरे यांच्या गळ्याला कोयता लावला. तसेच जवळ झोपलेल्या चार महिन्यांच्या बाळाला पाय ठेवण्याची धमकी देत त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. कानातील झुमके ओढल्याने त्यांच्या उजव्या कानाची पाळी जखमी झाली. यानंतर चोरट्यांपैकी दोघांनी मनिषा गोरे यांचे पती, मुलगा व सुनेला धमकावत कपाटातील दागिने बाहेर काढून घेतले. घरातील कपाटे उचकटून सोन्याचे हार, नथ, कर्णफुले, साखळ्या, अंगठ्या, चांदीच्या पायातील पट्ट्या असा १३ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज आणि दीड लाख रुपयांची रोख रक्कम, असा एकूण १४ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

Jamkhed Robbery
Ahilyanagr Bal Sangopan Yojana: बालसंगोपन योजनेला ३० कोटींचा दुसरा हप्ता; दीड लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार दिलासा

चोरी करून निघताना चोरट्यांनी मनिषा गोरे यांच्या बेडरूमला बाहेरून कडी लावली. तसेच कुटुंबीयांनी आवाज केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. काही वेळाने कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. त्यानंतर अक्षय गोरे यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मनिषा गोरे यांच्या कानाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर नान्नज ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Jamkhed Robbery
Ahilyanagr Kopardi Case: कोपर्डी प्रकरण: मृत्युदंडाच्या अपिलावर सुनावणी; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची घटनास्थळी पाहणी

तक्रारीनुसार, महिलेच्या गळ्याला कोयता लावणारे दोन चोरटे अंदाजे १८ ते २५ वर्षे वयोगटातील, सडपातळ व बुटक्या बांध्याचे होते. तर पती, मुलगा व सुनेला धमकावणारे अन्य दोन चोरटे अंदाजे १८ ते २२ वर्षे वयोगटातील, मजबूत बांध्याचे व सुमारे ५ फूट ५ इंच उंचीचे होते. सर्व चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ तसेच फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या धाडसी जबरी चोरीचा तपास सुरू असून, चार अनोळखी चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news