Digital Detox India Pudhari
अहिल्यानगर

Digital Detox India: ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ मोहिमेला सुरुवात

अहिल्यानगर जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’ संस्थेचा उपक्रम; मुलांना मोबाईलच्या अतिवापरापासून वाचवण्याचा संकल्प

पुढारी वृत्तसेवा

नगर : मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर दुष्परिणाम होताना दिसत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मुलांना मोबाईलपासून कसे दूर ठेवता येईल, त्यांच्या मोबाईल अतिवापरावर नियंत्रण कसे मिळवता येईल, यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि शहरातील ऋणानुबंध संस्थेच्या पुढाकारातून ‌‘डिजिटल डिटॉक्स इंडिया‌’ हा देशातील पहिला उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून मुलांवर होणाऱ्या मोबाईलच्या अतिवापराचा दुष्परिणामाबाबत जनजागृती करून, मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण मिळविण्याच्या आणि मुलांचे भविष्य सुनिश्चित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषद व ऋणानुबंध सामाजिक संस्थेतर्फे ‌‘डिजिटल डिटॉक्स इंडिया‌’ या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, मनपा प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, अभिनव आयटीचे प्रा. मुरलीधर भुतडा यांच्यासह जिल्हा आणि शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक या वेळी उपस्थित होते.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्वतंत्र वेबिनार आयोजित करण्यात येणार असून त्यात मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक परिणाम याबाबत नामवंत डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक यांचे मार्गदर्शन तसेच उपाययोजना सांगितल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ऋणानुबंध संस्थेचे उपाध्यक्ष सारिका रघुवंशी, सचिव प्रशांत बंडगर, महेश घावटे, डॉ. खंडागळे, डॉ. कंगे, प्रतिभा साबळे, डॉ. झेंडे, सचिन परदेशी, भानुदास महानोर, मोहन परोपकारी, सोमवंशी दांपत्य, यांच्यासह ऋणानुबंधाचे सदस्य तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाचे...

मोबाईलच्या वापराचे मुलांमध्ये व्यसनात रूपांतर

परिणामी लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक व्याधी

रिल्स, सोशल मीडियावरील व्हिडीओ, अलिलता, गेमिंग यांचा वाढता वापर धोकादायक

‌‘इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर‌’ला जागतिक आरोग्य संघटनेकडून 2019 मध्येच डिसीज म्हणून मान्यता

भारतात...

सर्वसाधारणपणे प्र्रत्येकाचा रोजचा सरासरी स्क्रीन टाईम 6 तास 37 मिनिटे

पौगंडावस्थेतील 33 टक्के मुले मोबाईल व्यसनाधीन (मुले 33.6%, मुली 32.3%)

5 ते 16 वर्षांदरम्यानच्या 60 टक्के मुलांमध्ये तत्सम लक्षणे

85 टक्के पालकांना मुलांच्या या सवयी बदलणे अवघड जात आहे.

54 टक्के माता स्वतःचे काम शांतपणे संपवण्यासाठी मुलांना मोबाईल देतात.

34.5 टक्के मुलांवर मनगट आणि मानेचे विकार

54.8 टक्के मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम. चिडचिडेपणा, हिंस्रता, एकटेपणा, निद्रानाश, अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे

शाळांमधून पालकांचे समुपदेशन : सीईओ भंडारी

सीईओ आनंद भंडारी या वेळी म्हणाले, की मोबाईल अतिवापरामुळे मनुष्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक हानी पोहोचत आहे. भारतीय माणूस सरासरी 6 तास मोबाईल, लॅपटॉपवर असतात. त्यानंतर आपला वेळ सोशल मीडियावर जातो. त्याचे फायदे-तोटे पाहणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता अतिमोबाईलमुळे कमी होत आहे, अभ्यासाची प्रगती खालावत आहे. नको त्या गोष्टींच्या आहारी विद्यार्थी जात आहेत. मुलांच्या मेंदूवर परिणाम होत आहे. आपली स्मरणशक्ती कमी होत आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पहिल्यांदा पालक, शिक्षक यांना मोबाईल वापरायचे धोके, तोटे जाणून घेेणे गरजेचे आहे, त्यासाठी आधी पालकांचा मोबाईल वापर कमी झाल्यास विद्यार्थ्यांना समजून सांगता येईल. त्यामुळे या मोहिमेची सुरुवात पालक आणि शिक्षकांपासून करायची असल्याने शाळांमधून याचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

पालकांच्या हाती नियत्रंण : अजित रोकडे

ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने जिल्हा परिषद आहिल्या नगरच्या सहकार्याने यासाठी मोहीम उघडली असून या मोहिमेंतर्गत संपूर्ण नगर जिल्ह्यातील 8 लाख 38 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांच्या संतुलित मोबाईल वापराबाबत वेबिनारच्या माध्यमातून जागृत केले जाणार आहे. यासाठी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगचे राष्ट्रीय प्रशिक्षक व कौशल्य विकास मंत्रालयाच्या मिशन कर्मयोगीसाठीचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे. मुलांच्या मोबाईलमधील नको असलेल्या वेबसाईट, गेम्स, ब्लॉक करणे किंवा त्यांचा मोबाईल वापराचा वेळ निर्धारित करणे पालकांना शक्य होईल, असे मोबाईल एप्लीकेशनही या मोहिमेत पालकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT