

शिवाजी क्षीरसागर
संगमनेर नगरपालिका निवडणुकीत महायुती विरोधात राजकीय दोन हात करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी ‘संगमनेर सेवा समिती’ या पॅनलखाली समविचारी लोकांना एकत्र केले आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या सत्ता संघर्षात तांबे विरुद्ध खताळ अशा दोन आमदारांची ताकद अजमावली जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून कुणालाही अधिकृत उमेदवारी न दिल्याने पहिल्यांदाच बॅलेट पेपरवरून पंजा चिन्ह दिसणार नाही. आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे हे नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी तांबे-खताळ सामना
संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्षपदासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. तर महायुतीकडून शिवसेनेच्या नगराध्यक्षपदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा संदीप खताळ यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन असलेली उत्सुकता संपुष्टात आली.
थोरातांकडून तांबेंकडे धुरा
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरातील नगरपालिका निवडणुकीत फारसे लक्ष न घालता आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे सूत्रे दिली आहे. यामुळे आमदार तांबे यांनी सुरुवातीपासून शहरात संपर्क वाढवून संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली. इच्छुकांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली मात्र नवे जुने हा वाद उफाळून आला.
काँग्रेसच्या गोटात नाराजीचा सूर
आमदार थोरातांना मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देताना शाब्दिक वादही झाले. यातून मार्ग काढत असताना शहर विकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली होती. अखेर सोमवारी पालिका निवडणूक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून लढविण्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेसच्या गटात काहीशी नाराजी पसरली. पालिका निवडणुकीत यंदा प्रथमच पंजा चिन्ह गायब झाले आहेत.
थोरातांच्या अनुपस्थितीत उमेदवारांची घोषणा
माजी महसूल मंत्री हे राज्यात काँग्रेसचे वजनदार नेते असून काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांचे संगमनेरकडे लक्ष लागून होते. मात्र स्वतः बाळासाहेब थोरातच पालिका निवडणुकीत सक्रिय दिसले नाहीत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी बाळासाहेब थोरात संगमनेरात नव्हते. याबाबत काल दिवसभर चर्चा सुरू होती. स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा पत्रकार परिषदेत केली केली.
महायुती आपापल्या चिन्हावरच लढणार
दुसरीकडे महायुती अधिकृत पक्ष चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली. सामूहिक पणे महायुतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आमदार खताळ यांनी शिवसेनेकडून अनेक उमेदवारांना संधी दिली आहे. पक्षाचे अधिकृत चिन्ह घेऊनच महायुतीचे उमेदवार जनतेसमोर जाणार असल्याचे आमदार खताळ यांनी जाहीर केले.
घराणेशाही’वर उत्तर काय?
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांच्यावर आमदार अमोल खताळ यांनी घराणेशाहीचा आरोप केला होता. मात्र आता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी खताळ यांनी आपल्याच वहिनींना जाहीर केल्याने आता ‘घराणेशाही’वर ते जनतेसमोर काय उत्तर घेऊन जाणार याविषयीची विरोधकांनी चर्चा सुरू केल्या आहेत.
डोक्यावरचा हात कुठपर्यंत?
थोरात यांचे आशीर्वाद घेऊन आमदार तांबे रिंगणात उतरले आहे. तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही खताळांना ताकद देताना दिसत आहेत. मात्र, ही ताकद संगमनेर कारखाना निवडणुकी प्रमाणे ऐनवेळी डोक्यावरचा हात काढणारी असेल का, याकडेही लक्ष असणार आहे.
सुवर्णा खताळ विरोधात डॉ. मैथली तांबे मैदानात
महायुती विरोधात आमदार तांबे वेगळे चिन्ह घेणार
माजी मंत्री थोरातांच्या संगमनेरातूनच पंजा गायब