

दीपक देवमाने
जामखेड: जामखेडचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. भाजप, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, आम आदमीसह काँग्रेस, आदींनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. महायुतीत महाबिघाडी झाल्याचे दिसत आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपचा सस्पेस कायम राहील, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून संध्या शहाजी राळेभात यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपकडून प्रांजली चिंतामणी व सुनीता राळेभात यांच्या नावांची चर्चा आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल.
महायुतीमधील मित्रपक्षाने स्वतंत्र उमेदवार अर्ज दाखल केल्याने विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपच्या उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे. उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसताच भाजपच्या अनेक इच्छुकांनी शिंदे यांच्या शिवसेना व अजित पवार व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पक्षबदलामुळे चांगलीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र समोर आले.
मागील नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप 3, शिवसेना 4, राष्ट्रवादी 10, तर 3 उमेदवार अपक्ष , तर एक मनसेकडून असे निवडून आले होते. गत निवडणुकीवेळी सभापती प्रा. राम शिंदे हे नगरचे पालकमंत्री होते. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी 21 पैकी 10 जागा मिळवत सत्ता हस्तगत केली होती. आता धस भाजपचे आमदार असल्याने समीकरणे वेगळे असणार आहेत. भाजपविरोधात शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिवसेना शिंदे पक्षाचे व आम आदमी आदीं पक्षांनी देखील नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. जामखेडच्या नगराध्यक्षपदासाठी 24 उमेदवारी अर्ज, तर नगरसेवकपदासाठी 221 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष,आम आदमीच्या इच्छुकांचा समावेश आहे.
दि 17 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत कोणत्या पक्षाने किती अर्ज दाखल केले, याची माहिती उपलब्ध झाली नव्हती. प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही पक्षाने नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या उमेदवारीबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. भाजपकडून सुनीता राळेभात व प्रांजल अमित चिंतामणी यांचे अर्ज दाखल आहेत. उशिरा पर्यंत त्यांच्या उमेदवारी गुप्तता पाळण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून संध्या राळेभात यांचा अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांनी 23 नगरसेवकपदासाठी, तर एक उबाठासाठी 1 जागा अशा 24 जागांसाठी अर्ज भरले. नगराध्यक्षापदासाठी शिवसेना शिंदे पक्षाकडून पायल बाफना यांनी अर्ज भरला तर त्यांच्याबरोबर नगरसेवकपदासाठी 18 उमेदवारी अर्ज भरण्यात आले. आमचे 25 उमेदवार होते. परंतु बड्या शक्तींनी आमचे इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यापासून परावृत्त केल्याचा आरोप शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष प्रा. कैलास माने व युवा नेते आकाश बाफना यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुवर्णा निमोणकर यांना दिली. नगरसेवकपदासाठी 13 उमेदवार दिले तर दोन उमेदवार वंचित बहुजन आघाडी तर एक मित्र पक्षांना दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व मित्रपक्षांनी एकूण 24 पैकी 16 जागांवर नगरसेवकपदासाठी उमेदवार दिले आहे, अशी माहिती अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी दिली.