

बाळासाहेब खेडकर
नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेवगावात नाट्यमय घडामोडी घडल्याने राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली. भाजप प्रदेश कार्यकारीणीचे सरचिटणीस अरुण मुंडे यांनी अखेरच्या क्षणी बंडखोरी करत पत्नी माया यांना शिवसेनेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली. आता मुंडे यांची लढत भाजप तालुकाध्यक्ष महेश फलके यांच्या पत्नी रत्नमाला यांच्याशी होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादीकडून (शरद पवार) परवीन एजाज काझी आणि राष्ट्रवादी (अजित पवार) विद्या अरुण लांडे, काँग्रेसच्या इंदिरा सुधीर बाबर यांचेही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आल्याने चुरस निर्माण झाली आहे.
अरुण मुंडे हे भाजप प्रदेश सरचिटणीस आहेत. शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी ते सुरूवातीपासून प्रयत्नशील होते. अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांना काम पाहिले आहे. जिल्हाध्यक्ष पदाची खांदेपालट झाल्यानंतर मुंडे यांना प्रदेश समितीवर स्थान देण्यात आले. मुंडे हे भाजपमध्ये असले तरी भाजपच्या स्थानिक आमदार मोनिका राजळे यांच्याशी त्यांचे पक्षांतर्गत वितुष्ट आहे. आ. राजळे- मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्यानेच नव्हे तर राज्यानेही अनेकदा अनुभवलेला आहे. नगरपालिका निवडणुकीतही त्या अतंर्गत संघर्षाचा प्रत्यय आला.
एकीकडे मुंडे पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, तर दुसरीकडे आ. मोनिका राजळे या भाजप तालुकाध्यक्ष महेश फलके यांच्या पत्नी रत्नमाला यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्यात आ. राजळे यांनी बाजी मारली. आ. राजळे समर्थक फलके यांना उमेदवारी जाहीर होताच अरुण मुंडे यांनी शिवसेनेचे ‘धनुष्य’ उचलले. पत्नी माया मुंडे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचा एबी फॉर्म जोडला. त्यामुळे मुंडे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचे स्पष्ट झाले.
गत 25 वर्षापासून मुंडे हे भाजपात सक्रीय आहेत. मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंडे यांचे सख्य आहे. भाजपचे प्रदेश पदाधिकारी असतानाही केवळ स्थानिक आमदार राजळे यांच्या विरोधासाठी त्यांनी ऐनवेळी ‘धनुष्य’ हाती घेतल्याचे समोर येताच शेवगावच्या राजकारणात धमाका झाला.
महायुतीतील भाजपांतर्गत वादाचे नाट्य सुरू असतानाच तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही सवतासुभा मांडला. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी विद्या अरुण लांडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही स्वबळाचा निर्णय घेत नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार दिले. ॲड. प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीकडून काझी परवीन एजाज तर काँग्रेसने इंदिरा सुधीर बाबर यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरविले आहे.
भाजपातंर्गत संघर्ष उफाळला; शिंदे सेनेतही नाराजी नाट्य
माया मुंडे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अरुण मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. भाजपने तालुकाध्यक्ष महेश फलके यांच्या पत्नी रत्नमाला यांच्या उमेदवारीचा निर्णय घेताच मुंडे यांनी अखेरच्या क्षणी शिंदेची उमेदवारी दाखल केल्याने पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला. शिंदे सेनेकडून विद्या गाडेकर या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या, पण मुंडे यांच्या ऐनवेळच्या निर्णयाने त्या नाराज झाल्या. आता त्यांची नाराजी दूर करण्यासोबतच स्वपक्षीयसोबतच लढण्याची कसरत मुंडे यांना करावी लागणार आहे. मुंडे यांची उमेदवारी कोणासाठी धोकादायक, लाभदायक यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.