

नगर : गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी आपल्या हल्ल्यात शालेय विद्यार्थ्यांना शिकार बनविल्याचे दिसले. अनेक गावांमध्ये नरभक्षक बिबट्या मोकाट असताना, पालक बैचेन असल्याचे दिसले. प्रशासनाकडूनही चिंता व्यक्त केली जात होती. जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना गंभीरपणे घेताना, आता शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आज बुधवारपासून सकाळी 9.30 ते दुपारी 4 अशी शाळेची नवी वेळ असणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लहान मुलांवरील बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत्या आहेत. काही दिवसांपूर्वी पारनेर, अहिल्यानगर आदी तालुक्यांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. शालेय विद्यार्थी बिबट्याची शिकार झाल्याचे दिसले. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक होते.
नगर जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत येतात व शाळा सुटल्यावर पायी घरी जातात. रस्त्याच्या कडेने बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र, ऊस क्षेत्र, जंगल क्षेत्र, डोंगराळ क्षेत्र अनेक ठिकाणी आहेत. सध्या ऊसतोडीमुळे उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबटयांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच सद्यस्थितीत हिवाळा ऋतूमुळे संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्याने शाळेतून घरी जाताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे एकही विद्यार्थ्याला हानी पोहचू नये, यासाठी संध्याकाळी अंधारापूर्वी ते शाळेतून घरी पोहचू शकतील, यासाठी बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांच्या वेळेत सकाळी 9.30 ते दुपारी 4.00 असा बदल शाळा व्यवस्थापन समिती शाळा समितीची मंजूरी घेवून करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
सर्वच शाळास्तरावर सकाळच्या परिपाठात सुरक्षिततेबाबत सर्व विद्यार्थ्यांचे तत्काळ उद्बोधन करण्यात यावे. शाळास्तरावर पालक मेळावे घेऊन शाळेत येताना व शाळा सुटताना पाल्यांना स्वतः घेऊन जाणेबाबत पालकांना आवाहन करावे. प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची वर्गशिक्षकांनी खात्री करणे आवश्यक आहे, तसेच शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या सभा दरमहा घेवून विदयार्थी सुरक्षेच्या अधिकच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केल्या आहेत.