Dhangarwadi Akhand Harinam Saptah Pudhari
अहिल्यानगर

Dhangarwadi Akhand Harinam Saptah: धनगरवाडीत आजपासून १७९वा अखंड हरिनाम सप्ताह; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

१३० एकरांत धार्मिक सोहळ्याची तयारी पूर्ण; १६८ तास अखंड भजन, ३५० पोलिसांचा बंदोबस्त, आमटी-भाकरीच्या महाप्रसादाची जय्यत व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर/पुणतांबा: श्रीक्षेत्र धनगरवाडी (ता. राहाता) येथे योगीराज सद्‌गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सप्ताहस्थळ तयार झाले आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी मंडप, अखंड भजन, कीर्तन-प्रवचन, महाप्रसाद, कृषी प्रदर्शन, वाहतूक, पार्किंग, आरोग्य, स्वच्छता, वीज आणि सुरक्षा व्यवस्थांना अंतिम स्वरूप दिले आहे.

राहाता तालुक्यातील धनगरवाडी आणि श्रीरामपूर तालुक्यातील दिघी या दोन गावांच्या मध्यवर्ती परिसरातील सुमारे १३० एकरात लाखो भक्तांच्या उपस्थितीत हा हरिनामाचा जागर होत आहे. सप्ताहाचे संपूर्ण नियोजन महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या सप्ताहाला सुमारे २०० वर्षांची परंपरा लाभली असून भक्ती, नामस्मरण आणि समाजप्रबोधनाचा हा वारसा आजही श्रद्धेने जपला जात आहे.

आज सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांसाठी धनगरवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने पुरणपोळी व मांड्यांचा विशेष प्रसाद देणार आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहभागातून आणि सेवाभावातून हा प्रसाद तयार करून भाविकांना वितरित करण्यात येणार आहे.

सप्ताहातील मुख्य अखंड भजन मंडप ३०० बाय २०० फूट आकाराचा उभारला आहे. सप्ताह कालावधीत दररोज चार पहारे होणार असून प्रत्येक पहाऱ्यात सुमारे ३ हजार टाळकरी सहभागी होणार आहेत. त्यामुळे तब्बल १६८ तास अखंड भजन सुरू राहणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ९ ते ११ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत कीर्तन होणार आहे. दररोज दुपारी १ ते २ या वेळेत सुश्राव्य प्रवचन होणार आहे. एकादशीनिमित्त सोमवारी (दि.२४) दुपारी २ ते ४ या वेळेत विशेष कीर्तन होणार आहे. मंगळवारी (दि.२५) सकाळी ९ ते ११ या वेळेत महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाच एकरांत पार्किंगची व्यवस्था

सप्ताहस्थळाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती व आवश्यक देखभाल केली असून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवले आहेत. लाखो भाविकांची ये-जा लक्षात घेता सप्ताहस्थळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर आवश्यक नियोजन केले असून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी व्यवस्था केली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुमारे पाच एकर प्रशस्त जागेवर पार्किंगची व्यवस्था केली आहे.

श्रीरामपुरातून आज स्वागत रॅली

सप्ताहासाठी श्रीक्षेत्र सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे श्रीरामपूर शहरातून मार्गक्रमण होणार आहे. त्यानिमित्त श्रीरामपूर बाजार समिती येथून सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. शहरात श्रीराम मंदिर, मेनरोड, नगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह विविध ठिकाणी श्रीरामपुरातील भाविक रॅलीचे स्वागत करणार आहेत.

बंदोबस्ताला १२ अधिकाऱ्यांसह ३५० पोलिस

लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेता सुरक्षेलाही विशेष महत्त्व दिले आहे. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे तसेच राहाता तालुका पोलिस ठाण्याच्या अंतर्गत चोख पोलिस बंदोबस्त ठेवणार आहे. यासाठी १२ पोलिस अधिकारी, ३५० पोलिस कर्मचारी, महिला पोलिस तसेच होमगार्ड तैनात असणार आहेत. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

आमटी-भाकरीसाठी ६०० ट्रॅक्टर

सप्ताहस्थळ भव्य पाकगृह तयार केला असून येथे लाखो भाविकांसाठी आमटी-भाकरीचा महाप्रसाद तयार केला जाणार आहे. यासाठी ७५ डिझेल भट्ट्यांची व्यवस्था केली आहे. भाविकांकडून आणण्यात येणाऱ्या भाकरी साठवण्यासाठी १०० बाय २०० फूट आकाराचे स्वतंत्र स्टोअर रूम उभारले आहे. सप्ताह सुरू झाल्यानंतर सुमारे पाच दिवस आमटी-भाकरीचा महाप्रसाद सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. धनगरवाडी पंचक्रोशीतील चार-पाच हजार स्वयंसेवक महाप्रसाद वाटप सेवेत सहभागी होणार असून पंगतीपर्यंत आमटी-भाकरी पोहोचवण्यासाठी सुमारे ५०० ते ६०० ट्रॅक्टर कार्यरत राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT