

अमोल गव्हाणे
श्रीगोंदा: महाराष्ट्रात दर वर्षी हजारो नागरिक, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी सर्पदंशाला बळी पडतात. या गंभीर सार्वजनिक आरोग्य प्रश्नावर ठोस पाऊल उचलत सर्पदंशाला महाराष्ट्रात ‘अधिसूचित आजार’ (Notified Disease) म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी ३० जून २०२६ रोजी विधानसभेत एका प्रश्नाद्वारे केली होती. त्या वेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्पदंशाला अधिसूचित आजार करण्याबाबत शासन सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोमवारी नागपंचमीचा सण आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आजच सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केल्यास या निर्णयाला मोठा सामाजिक संदेश आणि व्यापक जनजागृतीचे स्वरूप मिळू शकते, असे मत पाचपुते यांनी व्यक्त केले आहे. राज्यात उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार दरवर्षी साधारणतः ५० ते ६० हजार सर्पदंशाच्या घटना नोंदवल्या जातात. मात्र ही केवळ अधिकृतरीत्या नोंद झालेली संख्या आहे. प्रत्यक्षात ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक सर्पदंशाच्या घटनांची शासनाच्या यंत्रणेकडे नोंदच होत नसल्याने वास्तविक संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
सर्पदंश अधिसूचित आजार झाल्यानंतर त्याच्या प्रकरणांची अनिवार्य व व्यवस्थित नोंदणी करण्याची व्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या भागात, कोणत्या कालावधीत सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे, उपचारासाठी किती वेळ लागतो, मृत्यूचे प्रमाण किती आहे आणि उपचारांमध्ये नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत याचा अधिक अचूक डेटा शासनाला उपलब्ध होऊ शकेल.
उपचारानंतरच्या परिणामांवर संशोधनाची गरज
सर्पदंशाचा विषय केवळ रुग्णाचा जीव वाचवण्यापुरता मर्यादित नाही. सर्पदंशानंतर तसेच Anti-Snake Venom (ASV) व इतर उपचारांनंतर रुग्णांच्या शरीरावर होणारे दीर्घकालीन परिणाम आणि दुष्परिणाम याबाबत पुरेशा प्रमाणात माहिती व संशोधन उपलब्ध होणे आवश्यक आहे.
सर्पदंशातून वाचलेल्या रुग्णांचे पुढे काय होते? त्यांच्या किडनी, मज्जासंस्था, स्नायू किंवा इतर अवयवांवर दीर्घकालीन परिणाम होतात का? उपचारानंतर पुनर्वसनाची गरज किती आहे? अशा अनेक बाबींवर महाराष्ट्रात व्यापक आणि दीर्घकालीन अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. सर्पदंश अधिसूचित झाल्यानंतर उपलब्ध होणारा व्यापक आणि प्रमाणित डेटा अशा संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
याबाबत आमदार पाचपुते ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले, की नोंद झाली तर डेटा मिळेल, डेटा मिळाला तर संशोधन होईल आणि संशोधन झाले तर उपचार अधिक प्रभावी होतील. सर्पदंशामुळे होणारे टाळता येण्याजोगे मृत्यू कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. सर्पदंश अधिसूचित झाल्यास अचूक नोंदणी, सर्पदंशाचे हॉटस्पॉट ओळखणे, उपचार व्यवस्थेचे नियोजन, Anti-Snake Venom उपलब्धतेचे नियोजन, उपचारानंतरच्या परिणामांचा अभ्यास आणि संशोधन या सर्व बाबींना चालना मिळू शकते.
विधानसभेत ३० जून रोजी मी हा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. सोमवारी नागपंचमीच्या दिवशी हा निर्णय झाला तर तो केवळ शासन निर्णय न राहता सर्पदंश प्रतिबंध, योग्य उपचार आणि जनजागृतीचा राज्यव्यापी संदेश बनेल.
आमदार विक्रम पाचपुते