Death Pudhari
अहिल्यानगर

Deulgav Siddhi Suspicious Death Case: देऊळगाव सिद्धीत पिकअप धडकेत मृत्यू संशयास्पद; एलसीबी तपासाची मागणी

पोलीस तपासावर आरोप; ‘अज्ञात वाहन’ दाखवण्याचा अजब सल्ला दिल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

नगर: देऊळगाव सिद्धी (ता. अहिल्यानगर) शिवारात पिकअपच्या धडकेत एकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. त्यात दोघांवर गुन्हाही दाखल झाला. पोलिसांनी सुरुवातीला गुन्ह्यांची नोंद करण्यास दिरंगाई केलीच, शिवाय गुन्हा नोंदवितानाही चुकीच्या गोष्टी नमूद केल्या. असे विविध आरोप करीत यातील फिर्यादीने आता या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, यात घातपाताची शंका व्यक्त केली असतानाही पोलिसांनी, ‌‘अज्ञात वाहनाची धडक दाखवा,‌’ असा अजब सल्ला देत गुन्ह्याती तीव्रताही कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

रामदास ताराचंद लगड हे या गुन्ह्यातील फिर्यादी असून, त्यांचे बंधू संदीप तारांचद लगड यांचा त्या अपघातात मृत्यू झाला होता. याबाबत लगड यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनाचा आशय असा:

19 जानेवारी 2026 रोजी वडगाव तांदळी येथील ऋषिकेश घिगे याचा चुलतभाऊ सदाशिव घिगे याचा फोन आला, की तुझ्या भावाचा अपघात झाला आहे. तत्काळ देऊळगाव सिद्धीच्या कारखान्याजवळ ये. तिथे गेलो असता भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अन्य लोकांच्या मदतीने त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविले.

जवळपास अपघाताविषयी चौकशी केली, तेव्हा समजले, की ऋषिकेश घिगे, राजेंंद्र घोंगडे व संदीप लगड या तिघांनी हॉटेल जंगली येथे जेवण केले. त्यानंतर संदीप लगड वडगाव तांदळीकडे कच्च्या रस्त्याने जात होता. त्यानंतर ऋषिकेश व राजेंद्र पिकअपमध्ये डिझेल टाकण्यासाठी गेले होते. त्याच वेळी संदीप लगड यास अज्ञात वाहनाने धडक दिली आणि तो त्यात गंभीर जखमी झाला, असे सांगण्यात आले. मात्र, हा सगळा प्रकार संशयास्पद दिसून आला. त्यामुळे ऋषिकेश बाळासाहेब घिगे व राजेंद्र रमेश घोंडगे यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि बीएनएस कलम 105 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मृताच्या अंगावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आहेत. त्यामुळे मारहाण करून खून केल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा अनेक शंका उपस्थित करीत फिर्यादीने नगर तालुका पोलिसांवर निवेदनात गंभीर आरोप केले आहेत.

आरोपींनी मयत संदीप लगड यांना पिकअपने पाठीमागून जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून ठार करून खुनाचा गुन्हा केला आहे. परंतु, पोलिसांनी जोराची धडक ‌‘देऊन‌’ऐवजी ‌‘लागून‌’ असा शब्दप्रयोग करीत गुन्ह्याची तीव्रता कमी केली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांचा अजब सल्ला

पोलिसांनी प्रथम खबर घेण्यास टाळाटाळ केली. नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते व वरिष्ठ अधिकारी ‌‘तुम्ही एखादे अज्ञात वाहन धडकून निघून गेले आहे, अशी फिर्याद द्या,‌’ असे सांगत होते, असा आरोपही करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने झाला आहे. घटनास्थळ वगळता अन्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. लवकरच दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल. तरीही तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यास हरकत नाही.
प्रल्हाद गिते, सहायक पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT