Murder Pudhari
अहिल्यानगर

Aranagav Businessman Murder Case: हॉटेल वादातून अरणगावच्या व्यावसायिकाचा मृत्यू; पाच जणांवर खुनाचा गुन्हा

मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर धक्कादायक सत्य उघड; नगर तालुका पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

नगर: हॉटेलमधील काचेचे फर्निचर फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अरणगाव येथील एका व्यावसायिकाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या या व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, मृत्यूचे कारण वेगळेच असल्याने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर चौकशी नेमण्यात आली.

त्यात पाच जणांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अधिकारी पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. भाऊसाहेब विश्वास नांगरे, जावेद छोटू आतार (दोघे रा. वाकळी ता. जि. अहिल्यानगर), कोमल फरसान मार्ट येथील कामगार असा पाच जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. मिठू कार्तिक दत्त (वय 42, रा. अरणगाव, ता. जि. अहिल्यानगर) मयत व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी 6 मार्च 2025 रोजी मिठू दत्त याच्या डोक्याला मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याचा तपास नगर तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे होता. अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याचा तपास होत नसल्याने एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे याप्रकरणाच्या चौकशीची मागणी होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सुपा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे चौकशी दिली होती. त्या चौकशीत अनेक धक्कादायक घटना समोर आली. कोमल फरसान मार्ट व हॉटेलचे मालक भाऊसाहेब नांगरे व जावेद आतार यांच्याशी मयत मिठू दत्त यांचा फर्निचरच्या नुकसानीवरून वाद झाला होता.

याच वादाचा राग मनात धरून भाऊसाहेब नांगरे, जावेद आतार आणि त्यांच्या हॉटेलमधील तीन कामगारांनी मिळून 6 मार्च 2025 रोजी अरणगाव येथील ‌‘अजय फॅब्रिकेशन‌’ दुकानात घुसून दत्त यांना लाथाबुक्क्यांनी व शस्त्राने मारहाण केली. या हल्ल्यात दत्त मिठू दत्त गंभीर जखमी झाले होते. त्यांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. 20 मार्च रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून तातडीने उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 17 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 23 मार्च रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे चौकशी स्पष्ट झाले. त्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक गडकरी यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलि अधिकारी शिरीष वमने करीत आहेत.

नगर तालुका पोलिसांचे पितळ उघडे

अरणगाव शिवारात 6 मार्च रोजी घटना घडली. त्यानंतर जमखीवर कायनेटिक चौक परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे पंधरा दिवस उपचार केल्यानंतर जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून ससून रुग्णालयात नेण्यात आले. इतका सगळा घटनाक्रम घडूनही नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. पुढे गुन्ह्याचा तपासाही थंड बस्त्यात ठेवला. सामाजिक कार्यकर्त्याने वाचा फोडल्यानंतर खरा प्रकार समोर आला. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनेचा सखोल तपास केला. दोन व्हिडीओ, खासगी रुग्णालयातील साक्षीदार यांचे जबाब नोंदवून खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातून नगर तालुका पोलिसांचे पितळ उघडले पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT