अकोले: राज्य शासनाने गाव, वाड्या रस्त्याने जोडण्यासाठी, तसेच ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत कामे घेतली. मात्र, अकोले तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून केलेली कामे अवघ्या अडीच महिन्यात उखडल्याने कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात असून, याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यात आली आहे.
अकोल्यातील गर्दनी बारामती रोड ते मुख्य रस्ता, पिंपळगाव निपाणी ते तालुका हद्द, लिंगदेव ते धुपे रस्ता, हिवरगाव गणोरे ते खातोडे वस्ती, वाघजाळी ते इजीमा 27, मोरेवाडी ते खैरदरा, सांगडेवाडी कुरकुंडी रस्ता, कौठे बु ते वनकुटे रस्ता, एजीमा 18 ते बहिरवाडी या रस्त्याचे काँक्रीटीकरण उखडले आहे. मार्च 2025 मध्ये रस्त्याचे कामाचे खोदकाम, भरावा, खडीकरण, सिमेंट काँक्रीटचे अशाप्रकारे अंदाजे 5 कोटी रुपयांचे अँडव्हान्स पेमेंट कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदारास दिले, परंतु प्रत्यक्षात बिलामध्ये जेवढी रकमा अदा झाल्या, तेवढी कामे झाली नाही.
दरम्यान, संबंधित निकृष्ट रस्त्यांची कामे पुन्हा न केल्यास प्रत्येक ठिकाणचे ग्रामस्थ अशी बोगस कामे स्वतः उखडून टाकतील, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी दिला आहे.
रस्त्यावरील काँक्रीटीकरण मटेरियलची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे जी कामे निकृष्ट दर्जाची झाली, ती पुन्हा नव्याने करण्यात यावी. तसेच अकोले तालुक्यातील विविध गावांमधील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामात, गुणवत्तेचा मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. ठेकेदार आणि कार्यकारी अभियंता कार्यालयाने संगनमत करून 5 कोटींचा अपहार केल्याचा माझा दावा आहे. याची चौकशी व्हावी.बाजीराव दराडे, माजी जि.प. सदस्य
ग्रामसडकचे नऊ कामे मंजूर असून चार कामे अद्याप सुरू नाहीत. दोन कामांचे काँक्रीट तर दोन कामाचे डीएलसी झालेय. ग्रामीण भागात रस्ते करताना पर्यायी वाहतूक रस्ते नसतात. त्यामुळे काही लोक कच्च्या कामावरून गाड्या घालतात, रस्ते खराब होतात. खराब झालेले रस्ते पुन्हा करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार यांना दिल्या आहेत. सब ठेकेदार सूचनांना दाद देत नसल्याने मुख्य ठेकेदार यांना सूचना दिल्या आहेत.श्रीकांत नवले, सहाय्यक अभियंता, मु. ग्रा.स. योजना
कौठे बु ते वनकुटे रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे.जेएसबी केलेले नाही. तर डिएलसी उखडले आहे. ठेकेदार आज काम करतो, उद्या काम करतो असे सांगत, अद्यापही काम केले नाही. रस्त्याची काम दर्जेदार करण्यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव घेणार आहेत.पोपटराव हांडे, सरपंच, वनकुटे