

संगमनेर/घारगाव: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल केल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील बोटा येथे सोमवारी (दि. 12) नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, विकास क्रांती सेना व संघटनांच्या या आंदोलनामुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला.
अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, विनय सावंत, ज्येष्ठ नेते कारभारी उगले, जालिंदर वाकचौरे, बाजीराव दराडे, महेश नवले, किशोर डोके, जनार्दन आहेर, चंद्रकांत घुले, अजय फटांगरे, जालिंदर गागरे, किशोर डोके, गणपत फुलवडे, ज्ञानदेव गडगे, गौरव डोंगरे व सुहास वाळुंज यांच्यासह संगमनेर व अकोले तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाची भूमिका विकास क्रांती सेनेचे संतोष फापाळे व भगवान काळे आदींनी मांडली. पुणे-नाशिक रेल्वेमार्ग सिन्नर - अकोले - संगमनेर मार्गे गेला पाहिजे आणि देवठाण, संगमनेर व बोटा येथे रेल्वेस्टेशन झाले पाहिजे या मागणीवर आम्ही सर्वजण ठाम आहोत. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबर रेल्वे कृती समितीची बैठक होत नाही, तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा विविध नेत्यांनी भाषणांतून दिला.
नीलम खताळ यांनी आंदोलनस्थळावरून थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि उपस्थित आंदोलकांच्या भावना त्यांना सांगितल्या. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी महापालिका निवडणुका संपल्यानंतर लगेचच संगमनेर-अकोले रेल्वे कृती समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेऊ, असे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांच्या ठोस आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार असल्याने 20 तारखेच्या आत संगमनेर व अकोले तालुका रेल्वे कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणावी, अशी विनंती दूरध्वनीवरून बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे जाऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुणे-नाशिक रेल्वेमार्ग सिन्नर-अकोले-संगमनेरमार्गे नेण्याबाबत निवेदन द्यावे, अशी मागणीही केली.
डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, भारतीय किसान सभा