

चांदा: येथील शाहीद राजमहंमद शेख यांच्या हत्येप्रकरणी सोनई पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, शेळी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील उधारीवरून वाद झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत शाहीद शेख याचा चुलत भाऊ यासीन इब्राहिम शेख (वय 39) याने सोनई पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शाहीद शेख शेळी-बोकड विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामध्ये अक्षय बाळू जाधव यांच्याकडे शेळी-बोकड विक्रीचे 25 हजार रुपये बाकी होते. पैसे परत मिळण्यासाठी शाहीद शेख यांनी अक्षय जाधव यांच्याकडे गत महिन्यातच पैशाची मागणी केली होती. त्यावेळीही त्यांच्यात मोठा वाद झाला होता.
काल सूरज लतीफ शेख यांच्या शेतात कंदुरीचा कार्यक्रम होता. तेथे बोकड कापण्यासाठी शाहीद शेख याला बोलवण्यात आले होते. तेथे गेल्यानंतर सायंकाळीच्या सुमारास शाहिद शेख, सूरज लतीफ शेख, अक्षय बाळू जाधव यांच्यात वाद सुरू झाले. वाद एवढे विकोपाला गेले की शाहीद शेख याच्या छातीवर गोळ्या झाडण्यात आल्या.
ही माहिती मिळताच आपण घटनास्थळी गेलो. तेथे पाहिले असता शाहिद शेख याच्या छातीवर गोळ्या झाडलेल्या दिसल्या. तो त्याच ठिकाणी मृत झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सोनई पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन रुग्णवाहिकेत शाहिद शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार सोनई पोलिसांत सुरज लतीफ शेख व अक्षय बाळू जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी करत आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन न करता संभाजीनगरला शवविच्छेदन करण्याचा निर्णय झाल्याने शाहिदचा मृतदेह संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.