श्रीरामपूर: तालुक्यातील नायगाव गोदावरी नदीपात्रातील बेकायदा वाळू उपशाच्या कारणावरून दोन गटांत रविवारी रात्री घुमश्चक्री झाली. यावेळी काही चारचाकी वाहने फोडण्यात आली, तर एका जेसीबीचे नुकसान करण्यात आले.
काही जणांना लाठ्याकाठ्यांनी, मारहाणही करण्यात आली असून त्यात एक जण गंभीर जखमी झाल्याचे आणि एक जण बेपत्ता झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेला 24 तास उलटूनही याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळू उपशाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. या परिसरातील गोदा पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळूउपसा होत असतो. त्या ठिकाणी दुसऱ्या गटाने बेकायदा वाळूउपसा करण्याचा प्रयत्न केला असता, हा धुमश्चक्रीचा प्रकार घडला.
40-50 जणांच्या टोळक्याने या ठिकाणी आलेल्या 10-15 जणांना मारहाण सुरू केली. त्यातून पळापळ झाल्याने गोंधळ उडाला. परिसरातील वाड्या-वस्त्यांवर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी 2-3 वाहने फोडण्यात आली.
तसेच एका जेसीबीचे नुकसान करण्यात आले. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. त्यात गोळीबार झाल्याचीही चर्चा होती; मात्र ती अफवाच ठरली. दरम्यान, या घटनेनंतर काही वेळाने पोलिस घटनास्थळी आले; मात्र तोपर्यंत काही आरोपी पसार झाले. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी असून एक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.