अकोले : तालुक्यातील मुळा पट्ट्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाला अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अकोल्यात शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाकडूनच शालेय विद्यार्थिनींचा विनयभंगाच्या विविध घटना घडत असल्याने मुलींना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जाऊ लागला आहे.(Latest Ahilyanagar News)
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की मुळा पट्ट्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये दोन चुलत बहिणी असलेल्या विद्यार्थिनी शिकत आहेत. बुधवारी (दि.15) मुली रडतरडत घरी आल्यावर वडिलांनी विचारपूस केल्यावर एकीने सांगितलेली हकीकत अशी - मधल्या सुटीनंतर शाळा पुन्हा भरली तेव्हा मुख्याध्यापक लोहरे वर्गातील तीन-चार मुलींना म्हणाले की, कॉम्प्युटर रूम साफ करायचे आहे. म्हणून मुलींना कॉम्प्युटर रूममध्ये नेले. नंतर वर्गातील दोन मुलींना निघून जा, असे ते म्हणाले आणि त्या दोन मुली गेल्यानंतर लोहरे सरांनी दोन्ही अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यांनी मागील दिवाळीपासून वेळोवेळी असा प्रकार दुपारच्या सुटीनंतर दुसऱ्या वर्गात नेऊन केल्याचे या विद्यार्थिनीीं सांगितले.
त्या वेळी मी मुलीला तू सदर प्रकार आम्हाला लवकर का नाही सांगितला असे विचारले असता तिने आम्हाला सांगितले, की लोहरे सर आम्हाला म्हणायचे की तुम्ही जर घरी कोणाला सांगितले, तर मी तुम्हाला मारीन. त्यामुळे तुमचे पप्पाचे व माझे भांडण होईल. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितले नाही, असे मुली म्हणाल्याचे त्यांच्या पालकांनी पोलिसांनी सांगितले.
नोव्हेंबर 2024 पासून वेळोवेळी शाळेच्या आवारातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये माझी अल्पवयीन मुलगी व माझ्या भावाची अल्पवयीन मुलगी (दोघी वय 10) यांच्याशी अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन या मुख्याध्यापकाने केले. तसेच सदरचा प्रकार कोणाला सांगितला मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद या पालकांनी दिल्यानंतर मुख्याध्यापक गोरख कुशाबा लोहरे (रा. माळेगाव, ता. अकोले) याच्याविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरिक्षक हजारे तपास करीत आहेत.
संगमनेर : संगमनेरातील नामांकित शैक्षणिक संस्थेत मजुरी करणाऱ्या महिलेवर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
4 एप्रिल 2025 ते 23 सप्टेंबर 2025 या कालावधीत नवीन नगर रोडरील कॉलेजमध्ये ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तीस वर्षीय महिलेने याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. झाल्या प्रकाराची कोणाकडे तक्रार केल्यास फाशी घेऊन ’सुसाईड नोट’मध्ये तिचे नाव टाकण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेत यापूर्वी अशा घटना घडल्या असून पोलिस कारवाई करत नसल्याने त्या वाढतच असल्याची चर्चा आहे. कोणी महिला तक्रार करण्यास पुढे आली तर राजकीय दबावातून तक्रारदारालाच त्रास देण्याच्या प्रकाराने संस्था सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याची चर्चा आहे.