

पाथर्डी: तालुक्यातील सांगवी खुर्द येथील वृद्धेचे मंगळसूत्र दोघा चोरट्यांनी हिसकावून दुचाकीवरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Ahilyanagar News)
आश्राबाई रावसाहेब हाडके (वय 65,रा. सांगवी खुर्द) या मंगळवारी (दि. 15) दुपारी 1 वा सांगवी येथून पागोरी पिंपळगाव येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी पायी जात होत्या. त्या वेळी दोघे अनोळखी दुचाकीवर येऊन थांबले. त्यांनी आश्राबाईंना पागोरी पिंपळगाव येथे फायनान्सवर ट्रॅक्टर दिला आहे, त्यांच्याकडून हप्ता घ्यायचा आहे, त्यांचे घर माहीत आहे का? असे सांगत वृद्धेला दुचाकीवर बसविले.
त्यानंतर दोघे पुलाजवळ थांबले. वृद्ध महिला दुचाकीवरून खाली उतरल्या असता, मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. यानंतर आश्राबाईंनी मुलगा बलभीम हाडके यांना घटना सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.