

आश्वी: पिंप्री लौकी, अजमपूर येथील शिवाजी बोंद्रे यांच्या वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या मादी आणि तिच्या पाच महिन्यांच्या पिल्लांनी धुमाकूळ घातला होता. यामुळे परिसरातील ग्रामस्थ दहशतीत होते. मात्र, वन विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर सोमवारी एक बिबट्याचे पिल्लू आणि मंगळवारी रात्री उशिरा त्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले आहे. यामुळे परिसरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Latest Ahilyanagar News)
गेल्या अनेक दिवसांपासून बोंद्रे यांच्या वस्तीवर बिबट्याचे कुटुंब सातत्याने दिसून येत होते. यामुळे शेती कामांना जाणे आणि घराबाहेर पडणेही धोक्याचे बनले होते. ग्रामस्थांनी वन विभागाकडे मदतीची मागणी केली होती. यावर तात्काळ कार्यवाही करत वन विभागाने पिंजरा लावला.
सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याचे एक पाच महिन्यांचे पिल्लू या पिंजऱ्यात अडकले. पिल्लू पिंजऱ्यात अडकल्याने मादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने तत्काळ त्याच ठिकाणी दुसरा पिंजरा लावला. पिल्लाच्या ओढीने मादी बिबट्या निश्चितच परत येईल, अशी अपेक्षा वन अधिकाऱ्यांना होती.
वन विभागाचा अंदाज खरा ठरवत, मंगळवारी रात्री उशिरा पिल्लाच्या शोधात आलेली बिबट्या मादी देखील दुसऱ्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. यावेळी वनाधिकारी सुभाष सांगळे, वनपाल सुजित बोकडे, वनरक्षक रामेश्वर मंडपे, वनमजूर देवीदास चौधरी, सूळ, वाडेकर तसेच शिवाजी बोंद्रे, अशोक बोंद्रे आदींसह वस्तीवरील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.