

नगर: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 1344 गावांतील खरीप पिके, फळबागांची अतोनात हानी झाली. शेतात पाणीच पाणी झाल्याने रखडलेले पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील 6 लाख 26 हजार 186 हेक्टर क्षेत्रावरील पिके, फळबागांची 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. 8 लाख 30 हजार 637 शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानभरपाई अदा करण्यासाठी 880 कोटी 15 लाख 90 हजार रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest Ahilyanagar News)
सप्टेंबर महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाने हाहाकार उडवून दिला. या पावसाचा फटका पाथर्डी, शेवगाव, नगर, जामखेड, कर्जत, नेवासा, राहाता, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांना अधिक प्रमाणात बसला. अकोला वगळता सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसाने जोरदार हजेरी लावली. काढणीला आलेल्या खरीप पिकांची मातीमोल केली. फळबागांची देखील दुर्दशा करीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिला.
कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचे आढळून आले. पंचनामे केल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढला आहे. अंतिम अहवालात जिल्हाभरातील 8 लाख 30 हजार 637 शेतकऱ्यांची पिके, फळबागा हातची गेली. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तीन हेक्टरपर्यत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. त्यानुसार जिरायती पिकांना हेक्टरी 8500 रुपये, बागायती पिकांना 17 हजार तर फळबागांना 22 हजार 500 रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.
नेवाशाला सर्वाधिक फटका
नेवासे तालुक्यात सर्वाधिक 81 हजार हेक्टर क्षेत्रावर पिके, फळबागांना फटका बसला आहे. अकोला तालुक्यात फक्त 880 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात 6 लाख 26 हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. त्यात 3 लाख 88 हजार 706 हेक्टर बागायती पिके, 12 हजार 500 हेक्टर फळबागांचा तर 2 लाख 24 हजार 979 हेक्टर जिरायती पिकाचा समावेश आहे.