आश्वी: गेल्या आठवड्यात संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वेगवान वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. शेतातील उभ्या पिके भूईसपाट झाल्याने, सोंगणी, मळणीचे मजुरीचे दर वाढले आहेत. त्यातच, हा खर्च केल्यानंतरही गव्हाचा रंग पांढरा पडल्याने व्यापाऱ्यांनीही कवडीमोल भावात खरेदी सुरू केले आहे. त्यामुळे निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याचे आता शासनाच्या मदतीकडे डोळे लागले आहेत.
संगमनेर तालुक्यातील झरेकाठी, चणेगाव परसरात अवकाळी पावसाने हाहाकार उडवला होता. यातून विशेषतः गहू पिकाची दैना झाली होती. त्यामुळे उत्पादन खर्चही यातून निघू शकत नसल्याचे वास्तव आहे. वादळी वाऱ्याने गव्हाचे उभे पीक जमिनीवर लोळले आहे. भुईसपाट झालेल्या या पिकाची काढणी करणे आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
मजुरांची टंचाई इतकी भीषण आहे की, सोंगणीसाठी एकरी 8 हजार रुपयांपर्यंत मजुरी मागितली जात आहे. त्यातच मळणीचा खर्च पोत्यामागे 300 रुपये आहे. एवढा खर्च करून पदरात पडणारा गहू पावसाने काळवंडला आहे. ज्या गव्हाला 2300 रुपये दर अपेक्षित होता, तिथे आता व्यापारी मातीमोल भावाने मागणी करत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
कांदा पिकाची अवस्थाही अतिशय दयनीय आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेला कांदा सडू लागला आहे. ओलाव्यामुळे साठवणूक करणे शक्य नाही आणि बाजारात नेल्यास केंद्राच्या धोरणांमुळे दर गडगडलेले आहेत. ‘पीक काढून बाजारात न्यायचे की शेतातच सडू द्यायचे?‘ असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारत आहेत. मका पिकाचेही असेच नुकसान झाल्याने चारा टंचाईचे संकटही उभे ठाकले आहे.
पालकमंत्र्यांनी घेतली शेतकऱ्यांची दखल
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जनसेवा युवा मंचच्या सदस्यांनी राज्याचे महसूल व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनंतर महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण केले आहेत. प्रशासकीय पातळीवर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाने घायाळ झालेल्या बळीराजाला आता केवळ शासकीय आधाराचीच प्रतीक्षा आहे.