

नगर: कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंंत्रालयाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘शी-बॉक्स’ या ऑनलाइन प्रणालीची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या या पोर्टलद्वारे महिलांना आता केवळ कार्यस्थळावरील छळच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाड, शेरेबाजी किंवा रस्त्यावरील उपद्रवी प्रकारांविरोधातही थेट तक्रार नोंदवता येणार आहे.
पूर्वी ‘शी-बॉक्स’ पोर्टलचा वापर प्रामुख्याने अ‘कार्यस्थल पर महिलाओं का यौन उत्पीड़न (रोकथाम, निषेध एवं निवारण) अधिनियम, 2013’ अंतर्गत तक्रारींसाठी मर्यादित होता. मात्र, नव्या अद्ययावतीकरणामुळे महिलांच्या सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे पोर्टल प्रभावी ठरणार आहे.
‘शी-बॉक्स’ ही केंद्र सरकारची एक एकात्मिक तक्रार नोंद प्रणाली असून, ती सरकारी, खासगी तसेच असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी खुली आहे. या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर ती संबंधित आंतरिक समिती किंवा स्थानिक समितीकडे स्वयंचलितपणे पाठवली जाते. देशभरातील मंत्रालये, विभाग, जिल्हे आणि पोलिस यंत्रणांशी डिजिटल जोडणी, नोडल अधिकाऱ्यांमार्फत तक्रारींचे निरीक्षण, 90 दिवसांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्याची तरतूद, तक्रारदाराची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित ठेवणे आणि प्रकरणांच्या प्रगतीवर ऑनलाइन लक्ष ठेवण्याची सुविधा ही या पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. महिलांना अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. तक्रार आपोआप जिल्हा किंवा राज्य स्तरावरील समितीकडे पाठवली जाते.
अद्ययावत प्रणालीमुळे तक्रार प्राप्त होताच संबंधित परिसरातील पोलिस ठाण्याला तातडीने माहिती पाठवली जाते. त्यामुळे प्रशासकीय विलंब टळून पोलिसांकडून त्वरित मदत मिळणे आणि संशयितांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होते. तक्रार नोंदविल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून रेफरन्स नंबर, मोबाईल किंवा ईमेल वापरून तक्रारीची सद्यस्थिती, चौकशीची प्रगती आणि निकाल पाहता येतो. ईमेल व एसएमएसद्वारेही अद्ययावत माहिती मिळणार आहे.
छळाविरोधात महिलांनी पुढे यावे
महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक सक्षम केले आहे. महिलांनी या सुविधेचा प्रभावी वापर करून छळाविरोधात पुढे यावे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून तत्काळ मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी केले आहे.