

नगर: तुमची भावकीच घरभेदी आहे, म्हणून अडचणी वाढत आहेत. त्यावर मी तोडगा काढतो, असे म्हणत दहा रुपयांच्या नोटेमध्ये सोन्याची अंगठी ठेवायला सांगून हातचलाखी करून ती चोरून पळ काढणे, असा भोंदू भविष्यकारांचा काळा धंद्दा कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला. चिरीमिरीसाठी दुसऱ्याचे भविष्य सांगण्याचा ही मार्ग धरला अन् तो त्यांना थेट पोलिस कोठडीत घेऊन गेला.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी दोन भोंदू भविष्यकारांनी वृद्ध नागरिकांचा विश्वास संपादन करून सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यातील आरोपींच्या पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकाने काल मुसक्या आवळल्या.
पोलिस खाक्या दाखविल्यानंतर भोंदू भविष्यकाराचा गुन्हेगारीचा चेहरा उघड झाला. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक असा तीन गुन्ह्यांची उकल झाली. लुकमान सुलेमान मदारी, अल्ताफ हुसेन कुरेशी (रा. हल्दी, मोहल्ला, शिरूर जि, पुणे, हल्ली रा. निघोज, पारनेर) अशी भोंदू आरोपींची नावे आहेत.
आरोपी दोघे शहर परिसरात फिरून मंदिरे, उद्याने अशा जागा शोधून वृद्ध नागरिकांचा शोध घ्याचे. वृद्ध नागरिकाला एकटे बसलेले पाहून ते जवळ जात. त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर मी भविष्य सांगतो. देवावर माझी नितांत श्रद्धा आहे. तुमचं सगळं दुःख दूर होईल. त्यावर काही तोडगा करावा लागेल. इतक्यात भोंदू भविष्यकाराचा दुसरा जोडीदार येतो आणि तुम्ही सांगितलेलं भविष्य सगळं खरं झालं. आता मला कोणतीच अडचण नाही, असे सांगतो. त्यांचा दोघांचा संवाद ऐकून वृद्ध नागरिकाला त्या भोंदू भविष्यकारावर विश्वास बसतो. भोंदू वृद्धाला म्हणतो, मुलगा तुमचं ऐकत नाहीत.
भावकीचं आणि तुमचं फार जमत नाही.. असे सांगितल्यावर त्या भोंदूवर आणखी विश्वास बसतो. त्यानंतर भोंदू त्याला खिशातील दहा रुपयांची नोट काढण्यास सांगतो. तुमच्या हातातील अंगठी मंत्राने भारावी लागेल, असे सांगत अंगठी दहा रुपयांच्या नोटेमध्ये गुंडळतो. त्यानंतर रुमाल घेतो आणि नोटेसह अंगठी रुमालात गुंडाळतो, मंत्र पुटपुटल्याचे सोंग करतो. हातचलाखी करून अंगठी तळहातामध्ये दाबून ठेवतो आणि वृद्धाच्या हातात केवळ रुमाल देतो. त्यानंतर वीस पावले चालण्यास सांगून पाठीमागे न पाहण्यास सांगतो. वृद्धाला वीस पावले चालेपर्यंत हे दोघे पसार होतात. त्यानंतर वृद्धाने रुमाल उघडून पाहिल्यानंतर त्यात काहीच नसते. हा सगळा प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला. आता ते दोघे भोंदू आरोपी जेलची हवा खात आहेत.