Water Tanker Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Drought Water Shortage: अहिल्यानगर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; ३३ गावांची तहान टँकरवर

चारा आणि पाणीटंचाईचे दुहेरी संकट; जेऊरला तीन टँकरच्या खेपा अपुऱ्या पडण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: दुष्काळाच्या झळांनी नगर तालुका अक्षरशः होरपळून निघत आहे. शेतशिवारातील पिके हातची गेल्यानंतर आता गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आणि दुसरीकडे पाण्यासाठी सुरू असलेली नागरिकांची वणवण अशा दुहेरी संकटात ग्रामीण भाग सापडला आहे. सध्या तालुक्यातील तब्बल ३३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाची गावोगावी धावपळ सुरू आहे.

तालुक्यातील अनेक गावांमधील विहिरी, कूपनलिका आणि पाण्याचे स्रोत आटले आहेत. भूजल पातळी कमालीची खालावल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे टँकरच्या पाण्यावरच अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार अवलंबून आहे. गावापासून दूर असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जात आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी प्रत्यक्ष वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाण्याची परिस्थिती, रस्त्यांची उपलब्धता आणि टँकरच्या खेपांचे नियोजन करत आहेत.

जेऊर गावातही पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. गावचे प्रशासक सारंग दुगम आणि ग्रामपंचायत अधिकारी भागुजी मेहत्रे प्रत्यक्ष वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाणीपुरवठ्याची परिस्थिती जाणून घेत आहेत. टँकर पोहोचण्यास अडचण येणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन खेपांचे नियोजन केले जात आहे. कोणतीही वस्ती पाण्यापासून वंचित राहू नये आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

पाणीपुरवठ्याचे नियोजन २०११च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे होत असल्याने सध्याची वाढलेली लोकसंख्या आणि विस्तारलेल्या वाड्या-वस्त्यांच्या तुलनेत टँकरच्या खेपा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही गावांना मंजूर खेपांमध्येच पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी अनेक गावांकडून वाढीव टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी नव्याने टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. आगामी काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोर टँकरच्या खेपा वाढविणे, नव्या गावांचे प्रस्ताव मंजूर करणे आणि प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत नियमित पाणी पोहोचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जेऊरला तीन खेपा अपुऱ्या पडण्याची शक्यता!

जेऊर गावासाठी सध्या टँकरच्या तीन खेपा मंजूर आहेत. मात्र, गावाची लोकसंख्या, विस्तारणाऱ्या वाड्या-वस्त्या आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता या तीन खेपांमध्ये सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देताना ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागत आहे. सध्याची परिस्थिती पाहता लवकरच जेऊर गावासाठी वाढीव टँकरच्या खेपा किंवा अतिरिक्त टँकर सुरू करण्याची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT