Crop Sowing Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये दुष्काळातही रब्बीच्या पेरणीला वेग; ३९ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण!

ज्वारीचा सर्वाधिक २८ हजार ५७८ हेक्टरवर पेरा; धरणांच्या आवर्तनाच्या भरवशावर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

पुढारी वृत्तसेवा

दीपक ओहोळ

नगर: पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, आता बाधित शेतकरी तुटपुज्‍या अनुदानाच्‍या प्रतीक्षेत आहे. पाण्‍याअभावी रब्‍बी हंगामदेखील वाया जाण्‍याच्‍या अवस्‍थेत असतानाही, सध्‍या पाणी असलेल्‍या शेतकर्‍यांनी धरणांच्‍या आवर्तनाच्‍या भरवशावर रब्‍बी पेरणीस प्रारंभ केला आहे. ३० ऑक्‍टोबरपर्यंत ३९ हजार ८८८ हेक्‍टर क्षेत्रावर रब्‍बी पिकांची पेरणी झाली असून, यामध्‍ये सर्वाधिक २८ हजार ५७८ हेक्‍टरवरील ज्‍वारीचा समावेश आहे. याशिवाय ९ हजार ९४१ हेक्‍टरवर बारामाही उसाची लागवड झालेली आहे.

यंदा ‘एल निनो’चा प्रभाव अधिक असल्‍यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी आणि अधिक प्रमाणात पावसाचा खंड पडला. त्‍यामुळे यंदा सप्‍टेंबर महिन्‍यातच भूजलपातळी तीन मीटरने खालावली गेली. त्‍यामुळे आतापासूनच विहिरींनी तळ गाठण्‍यास प्रारंभ केला. भंडारदरा धरण शंभर टक्‍के, निळवंडे व मुळा धरणांत सरासरी ६५ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. त्‍यामुळे यंदा रब्‍बी हंगामदेखील पाण्‍याअभावी वाया जाण्‍याची शक्‍यता बळावली आहे.

दुष्‍काळी परिस्‍थितीतही सध्‍या ज्‍याज्‍याकडे पाणी आहे. त्‍यांनी धरणांच्‍या आवर्तनावर रब्‍बी पेरणीची हिंमत दाखविण्‍यास प्रारंभ केला. त्‍यानुसार जिल्‍हाभरात ३९ हजार ८८८.२५ हेक्‍टर पेरणी झाली आहे. सध्‍या ज्‍वारीचा पेरा अधिक आहे. गव्‍हासाठी १ लाख २८ हजार ४६२ हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित केले असून, आतापर्यंत ५२५ हेक्‍टर गव्‍हाची पेरणी झाली.

यंदा हरभरा १ लाख ८ हजार ४४० हेक्‍टर पेरला जाणार आहे. आतापर्यंत ४ हजार ७९९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली. तीळ, सूर्यफुलाची पेरणी अद्याप सुरु झालेली नाही. मुळा व कुकडी प्रकल्‍पांतून रब्‍बी आवर्तन सोडण्‍यात येत आहे. त्‍यामुळे रब्‍बी पिकांसाठी पाणी उपलब्‍ध होईल या आशेवर शेतकर्‍यांची पेरणीसाटी लगबग सुरु आहे. ज्‍वारीचा पेरा अधिक होण्‍याची शक्‍यता आहे. ज्‍वारीच्‍या उत्‍पन्‍नात घट झाली तरीही जनावरांसाठी चारा उपलब्‍ध होईल, अशा दुहेरी भूमिकेतून शेतकर्‍यांनी पेरणीस प्रारंभ केल्‍याचे दिसून येत आहे.

जामखेडमध्‍ये ज्‍वारी आघाडीवर

आजमितीस जामखेड तालुक्‍यात सर्वाधिक १९ हजार ४७१ हेक्‍टर क्षेत्रावर ज्‍वारीची पेरणी झाली. पारनेर तालुक्‍यात २ हजार ८३१ हेक्‍टरवर, कर्जतमध्‍ये ५०० हेक्‍टर, श्रीगोंद्यात ४१६, नगर तालुक्‍यात ४२३, पाथर्डीत ३७८, नेवाशात २३१ हेक्‍टर, श्रीरामपूर तालुक्‍यात ७२, कोपरगावात ६१ तर अकोले तालुक्‍यात ६१.३ हेक्‍टर पेरणी झालेली आहे.

तालुकानिहाय पेरणी

नगर : ६३५९, अकोले : ७७२, जामखेड : २२१००, कर्जत : १२८१, कोपरगाव : ७९७, नेवासा ७१६, पारनेर : ३४१८, पाथर्डी : ४९७, राहाता : ७०१, राहुरी : ७८९, संगमनेर : ६९७, शेवगाव : २३५, श्रीगोंदा : ८५९, श्रीरामपूर : ६६४. (हेक्‍टर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT