

नगर: दिवाळीनिमित्त अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठांतील कापड, फटाके आणि मिठाईसह इतर विविध खाद्यपदार्थांची तसेच किराणा दुकाने विविध आकर्षक सजावटीने आणि विद्युत रोषणाईने सजली आहेत. नोकरदारांचा दिवाळी बोनस आणि पगार झाल्याने गेल्या दोन तीन दिवसांपासून अहिल्यानगरातील बाजारापेठा गर्दीने फुलू लागल्या आहेत. रविवारी (दि.१) सुटीचा दिवस असल्याने कापडबाजारांसह सराफ बाजार, माळीवाडा, दालमंडई, कल्याणरोड, सावेडी आदी भागांत खरेदीसाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. रविवार हा सुटीचा दिवस खरेदीसाठी सुपर संडे ठरला आहे.
प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजला विशेष महत्त्व आहे.त्यामुळे दिवाळी म्हटले की अबालवृध्दांपासून सर्वांसाठीच आनंदाची पर्वणी. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच दिवाळी सणासाठी लगबग सुरु होत आहे. यंदा पावसाने दगा दिल्यामुळे ग्रामीण भागात उदासीनतेचे वातावरण असलेतरीही वर्षातून एकदा येणारा दिवाळीसाठी उत्साहाचे वातावरण असून, बाधित शेतकरी दुष्काळी पाच हजार रुपये ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत आहेत.
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून, वसुबारसापासून दिवाळीस प्रारंभ होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहर आणि उपनगरांसह श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यांच्या ठिकाणांसह पंचक्रोशितील बाजारपेठा सजल्या असून, विक्रीसाठी व्यापार्यांची लगबग सुरु झाली आहे. बोनस आणि फेस्टिवल ॲडव्हॉन्स आणि पगार झाल्याने घराघरांत आनंदाचे वातावरण पसरले असून, दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नोकरदार मंडळी कुटुंबांसह दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडू लागली.
गेल्या दोन दिवसांपासून कर्मचार्यांना सुटी असल्याने बाजारपेठेत गर्दी फुलू लागली आहे. रविवारी (दि.१) मात्र, खरेदीसाठी नागरिकांची अलोट गर्दी दिसून आली. रेडीमेड कापडला पसंती असल्यामुळे अहिल्यानगर शहरातील कापडबाजारातील लहानमोठ्या दुकानांसह सर्वच कापड दुकानांत खरेदीसाठी गर्दी झाली होती. कापडबाजाराबरोबरच दालमंडई येथील विविध प्रकारची किराणा दुकाने तसेच कल्याणरोड, सावेडी व माळीवाडा आदी ठिकाणी विविध प्रकारच्या फटाक्यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी लहान मुलांसह युवकांची मोठी गर्दी होती.
घराच्या सजावटीसाठी लागणारी विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी देखील शहरातील विविध दुकानांत गर्दी होती. दिवाळी सणासाठी विविध प्रकारच्या फराळाच्या तयारीसाठी शहर आणि उपनगरांतील तसेच दालमंडईतील विविध प्रकारच्या किराणा दुकानांत खरेदीसाठी महिलांची गर्दी उसळली होती. दिवाळी खरेदीसाठी रविवारी (दि.१) या सुटीच्या दिवशी नागरिकांची शहर आणि बाजारपेठेत अलोट गर्दी झाली. शहरातील ठिकठिकाणचे रस्ते आणि चौक वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. रविवार हा सुटीचा दिवस खरेदीसाठी सुपर सन्डे ठरला आहे.
शॉपिंग फेस्टिवल आणि कपड्यांची प्रदर्शने
अहिल्यानगर शहर आणि उपनगरांतील कापडासह सराफा, इलेक्ट्रिक वस्तूंचीतसेच किराणा दुकाने, घरगुती सजावटीसाठी लागणारे तोरणे, पणत्या, रंगबेरंगी दिवे आणि रंगीबेरंगी आकाशकंदिल आणि फटाक्यांची दुकाने आकर्षक सजावटीने सजली आहेत. विविध ठिकाणी शॉपिंग फेस्टिवल आणि कपड्यांची प्रदर्शने लागली आहेत. त्यामुळे बाजारपेठांत दिवाळीचा रौनक निर्माण झाला आहे. नोकरदार मंडळीचे बोनस आणि पगार झाल्यामुळे व्यापारीवर्गातही आनंदाचे वातावरण पसरले आहे.