Elections Voting Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Election Voting: अहिल्यानगर महापालिका : 17 प्रभागांतील 63 जागांसाठी शांततेत मतदान

दुपारनंतर मतदानाचा वेग; काही केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत रांगा

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेच्या 17 प्रभागांतील 63 जागांसाठी गुरुवारी (दि. 15) रोजी उत्साहात मतदान झाले. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. काही मतदान केंद्रावर सायंकाळी मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती. किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

निवडणुकीसाठी गुरुवारी 345 मतदान केंद्रांवर मतदान झाले. सुमारे 63 जागांसाठी 283 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी अभिरूप मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिंधी दिवसभर मतदान केंद्रावर फिरत होते. माळीवाडा शाळा, दिल्ली गेट येथील अद्यापक विद्यालय, आनंद विद्यालय अशा विविध केंद्रात किरकोळ वाद झाले. सकाळी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. मात्र, दुपारनंतर मतदार मतदानांसाठी बाहेर पडले. सायंकाळी सीताराम सारडा, प्रेमराज सारडा, राधाबाई काळे, सेंट जेव्हीअर, मुकुंदनगर येथील मतदान केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.

मतदान स्लिपचा गोंधळ

मतदारांना घरोघरी मतदानाच्या स्लिप वाटण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचा उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. मतदारांमध्ये स्लिपवरून गोंधळ उडाला. अनेकांना मतदान केंद्रच सापडत नव्हते. मतदार पोलिस प्रशासनाकडे विचारणा करीत होते.

अपक्ष उमेदवारांचा आपेक्ष

प्रभाग तीनमधील आनंद विद्यालयात उमेदवार प्रतिनिधी थेट घुसून हस्तक्षेप करत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार जयंत येलूलकर यांनी केला. पक्षाच्या उमेदवार प्रतिनिधी, कार्यकर्त्यांवर त्यांचा आक्षेप होता. याबाबत त्यांनी प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले. त्यांनी मतदान केंद्रावर भेटीसाठी आलेल्या पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे तोंडी तक्रार केली.

200 मीटरचा फज्जा

मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरावर कोणीही वाहन आणू नये अथवा गर्दी करू नये असे आदेशित होते. मात्र, अनेक मतदान केंद्रावर बॅरिकेडिंग लावल्यानंतरही वाहनांची राजरोसपणे येजा सुरू होती. बेल्लादार गल्ली, सीताराम सारडा मतदान केंद्रावर बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

क्लेरा ब्रूसमध्ये मोठी गर्दी

क्लेरा बू्रस हायस्कूल येथील मतदान केंद्रावर दुपारी 12 वाजता मतदानासाठी रांगा होत्या. सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी होती. पोलिसांनी तगडा बंदोबस्त नियुक्त केला होता. क्लेरा ब्रूस हायस्कूलमध्ये सुमारे आठ मतदान केंद्र होते.

किरकोळ वादावादी

प्रभाग दहामधील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या डीएड कॉलेजमधील मतदान केंद्रात उमेदवार जास्त वेळ आत थांबल्याने विरोधी उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली.

मतदारांच्या उन्हात रांगा

मतदारांना पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, काही केंद्रावर उन्हात उभे राहावे लागले. सर्जेपुरा भागातील अहिल्याबाई होळकर शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांनी उन्हात रांगा लावल्या होत्या.

मुकुंदनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

मुकुंदनगर हा परिसर प्रभाग चारमध्ये सकाळपासून मुकुंदनगरमधील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT