नगर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीत अनेक विद्यमानांचे (दि. 11) प्रभाग महिलांसाठी राखीव निघाल्याने त्यांनी ‘सौभाग्यवती’स मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या दोन माजी महापौर महिलांऐवजी आता त्यांचे मिस्टर महापालिका लढविणार आहेत. मुकुंदनगरच्या प्रभाग चारमध्ये दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण निघाल्याने गोची झाल्याचे दिसून येते.(Latest Ahilyanagar News)
महिला आरक्षणामुळे मिस्टरांऐवजी सौभाग्यवतीस निवडणुकीच्या रिंगणात उतरविणाऱ्यांमध्ये सुनील त्रिंबके (वार्ड 2), रवींद्र बारस्कर, अनिल बोरुडे (वार्ड 7), अशोक बडे (वार्ड 8), सचिन शिंदे, श्याम नळकांडे (वार्ड 9), बाळासाहेब बोराटे (वार्ड 12), अविनाश घुले, विपुल शेटिया (वार्ड 13), परसराम गायकवाड (वार्ड 15) यांचा समावेश आहे. माजी महापौर शीला शिंदे आणि रोहिणी शेंडगे यांचे वार्ड ओपन झाल्याने त्यांच्या जागेवर आता त्यांचे मिस्टर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा जाधव यांच्या 15 नंबर वार्डात ओबीसी आरक्षण निघाल्याने त्यांनी सर्वसाधारण महिला राखीव जागेवर निवडणूक लढविण्याचा पर्याय निवडला आहे. अशीच स्थिती बाळासाहेब बोराटे यांचीही झाली. बोराटे यांच्या 12 नंबर वार्डातील ओबीसीची जागा महिलेसाठी राखीव निघाल्याने त्यांनी खुल्या म्हणजे सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याऐवजी आता त्यांचे पती संजय शेंडगे निवडणूक लढणार आहेत. माजी महापौर शीला शिंदे यांच्या 15 नंबर वार्डातील जागा खुली झाली असली तरी त्या किंवा त्यांचे मिस्टर अनिल शिंदे दोघांनाही संधी मिळणार असली तरी अनिल शिंदे यांनीच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
सावेडीतील सहा नंबर वार्डातून करण उदय कराळे यांनी यंदा महापालिकेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या आजी आशाबाई कराळे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका होत्या. आता त्यांच्याजागी करण उमेदवारी करणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सावेडीतील 7 नंबर वार्डातून भाजप मंडलाध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ राजू काळे यांच्या पत्नी मनिषा आणि विद्यमान नगरसेविका वंदना ताठे या इच्छूक आहेत, मात्र याच वार्डातील विद्यमान नगरसेवक रवींद्र बारस्कर यांच्या जागेवर महिला आरक्षण निघाल्याने त्यांनी सौभाग्यवतींना पुढे केल्यास भाजपकडे दोन महिलांच्या जागेसाठी तिघींचा दावा होणार असल्याने उमेदवारीसाठी ओढताण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी 10 नंबर वार्डातून ओबीसी राखीव जागेवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पुतणे सोमनाथ जाधव यांनी नव्याने निर्माण झालेल्या पाच नंबर वार्डातून महापालिकेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तीन नंबर वार्डातून माजी नगरसेविका शोभाताई बोरकर यांच्याऐवजी आता त्यांचे चिरंजीव अजिंक्य निवडणूक लढविणार आहेत.
प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार यादी जाहीर झाली असली तरी महत्त्वाचे महापौर पदाचे आरक्षण निघणे बाकी आहे. अहिल्यानगर महापालिकेत ओबीसी महिला, अनुजाती, अनुजमाती, आरक्षण निघालेले नाही. महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव निघाल्यास संधी असूनही अनेक विद्यमान थांबून मिसेसला पुढे करत महापौर पदासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू करतील, अशी चर्चा रंगली आहे. त्यात माजी सभापती अविनाश घुले, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, शिवसेनेचे अनिल शिंदे, दत्ता जाधव, संभाजी कदम, धनंजय जाधव, निखील वारे यांचा समावेश असेल, अशी चर्चा आहे. अर्थात हा निर्णय महापौर पद आरक्षणावर अवलंबून असला तरी आतापासूनच त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आरक्षण निश्चिती मान्यतेसाठी आयोगाकडे
24 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार हरकती
नगर : मंगळवारी काढण्यात आलेली महापालिका आरक्षण सोडत मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर 17 नोव्हेंबरला आरक्षण जाहीर केले जाणार असून 24 नोव्हेंबरपर्यंत त्यावर हरकती घेता येणार आहे.
महानगरपालिकेच्या 68 जागांसाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून मंगळवारी आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण निश्चितीचा निकाल आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर 17 नोव्हेंबरला आरक्षण जाहीर केले जाणार असून त्यावर 24 तारखेपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
आयोगाचे निर्देश व लोकसंख्येनुसार अनुसूचित जमातीच्या एका जागेचे आरक्षण प्रभाग सातमध्ये थेट निश्चित करण्यात आले. लोकसंख्येच्या निकषानुसार अनुसूचित जातीच्या 9 जागा थेट आरक्षणाद्वारे निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यातील पाच महिलांच्या जागा चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 18 जागांपैकी 17 जागा थेट आरक्षणाद्वारे प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे निश्चित केल्या होत्या. एक जागा चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असलेल्या 9 जागांपैकी सहा जागा थेट आरक्षणाद्वारे निश्चित झाल्या. उर्वरित तीन जागा सोडत काढून निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाच्या 40 जागा असून त्यातील 20 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षण सोडत पारदर्शकपणे जाहीररित्या सभागृहात काढण्यात आली. या सोडतीचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते.
आयोगाच्या मान्यतेनंतर हरकती व सूचनांसाठी आरक्षण 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध केले जाईल. 24 तारखेपर्यंत त्यावर हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. हरकती व सूचनांचा विचार करून 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान अंतिम आरक्षण राजपत्रात 2 डिसेंबरला प्रसिद्ध केले जाणार आहे.यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक