

श्रीरामपूर : श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती झाली तर नगराध्यक्ष पद आपल्याच पक्षाला मिळावे म्हणून श्रीरामपुरातील स्थानिक नेत्यांमध्ये भेटीसाठी, बैठका व चर्चा होत असून यात काहीच ठरले जात नाही परंतु बाहेर अफवाच अफवा येत असल्याने कार्यकर्तेच सैरभैर झाले आहेत.(Latest Ahilyanagar News)
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे, परंतु काल पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. जोपर्यंत महायुतीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उत्साह दिसून येणार नाही.
महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार, भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनी पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती करावी की नाही, याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर अद्याप शांतता पसरली आहे. काय निर्णय घ्यावा याबाबत अनेक जण बुचकळ्यात पड ले आहेत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस असूनहीं वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय न झाल्यामुळे सगळेच वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची वाट पाहत आहेत.
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाला पक्षाला नगराध्यक्षपदाची संधी मिळावी म्हणून माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दोन दिवसापूर्वी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची लोणी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यांनतर काल सकाळी अनुराधा आदिक यांनी भाजपाचे संजय फंड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व पालिका निवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी आशिष धनवटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या दोन्ही बैठकामध्ये काय निर्णय झाला, याबाबत कळू शकले नाही. मात्र शहरात आदिक व फंड, बिहाणी यांचे भेटीमुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे. भाजपला नगराध्यक्षपद गेले तर राष्ट्रवादीला किती जागा दिल्या. काहींनी तर त्यांच्या जागाही निश्चित करून टाकल्या. अशा गमती जमती सुरू आहे. जोपर्यंत युतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला अर्थच नसल्याचे जाणकार सांगत आहेत.
उबाठा शिवसेनेला महाआघाडीत स्थानिक पातळीवर चांगल्या जागा मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी आघाडीत लढण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. त्यांच्या पक्षाच्या बैठका सुरू आहे. काल संध्याकाळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक झाली आजही ते आमदार ओगले व ससाणे यांची भेट घेणार आहेत.