

कोपरगाव : तालुक्यातील येसगाव शिवारात शेतात घास कापत असलेल्या शांताबाई अहिल्याजी निकोले (वय 60, रा. भास्कर वस्ती, कोपरगाव) यांच्यावर सोमवारी (दि. 10) सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला, संतप्त नागरिकांनी नगर-मनमाड महामार्गावर सहा तास रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने नरभक्षक बिबट्यांना मारण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या पाच दिवसांतील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची शहराजवळील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.(Latest Ahilyanagar News)
दरम्यान, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून नरभक्षक बिबट्याला तातडीने ठार मारण्याची मागणी केली.
टाकळी फाटा परिसरात बुधवारी ऊसतोडणी कामगारांच्या थळावर बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडी नंदिनी प्रेमराज चव्हाण (रा. तळेगाव, नांदगाव) हिचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. येसगाव शिवारात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास शेतात घास कापत असलेल्या शांताबाई यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. पाच दिवसात दोन जणांचा बळी गेल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचा आदेश येईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार नागरिकांनी केला.
आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, सुमित कोल्हे, तसेच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याला ठार मारण्याबाबत सरकारचा आदेश येताच अंमलबजावणीची ग्वाही मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आजही वनाधिकारी रोडे व त्यांच्या सहकाऱ्यांना फैलावर घेतले. पाच दिवसापूर्वी ऊसतोडणी मजुराची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली, त्यानंतर तुम्ही काय कारवाई केली, किती मिटिंग घेतल्या, तुमच्याकडे पिंजरे किती, मीटिंग घेतली तर प्रोसिडिंग दाखवा, असे सवाल उपस्थित केले. नगर जिल्ह्यात सुमारे 500 ते 600 बिबटे असल्याचा अंदाज असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. बिबट्याच्या प्रचंड दहशतीमुळे मुले शाळेत जाण्यास तयार नाहीत, शेतात काम करायला मजूर धजावत नाही, पेरू, चिकू, नारळ, मोसंबी आदी फळबागांमध्ये फळे तोडण्यास जायला मजूर नकार देतात. त्यामुळे शेतकरी आधीच अवकाळी पावसाने संकटात सापडलेला शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.
कोळपेवाडी ः बिबट्याच्या हल्ल्यात महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे वीस मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. शांताबाई निकोले यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. वन विभागाबाबात रोष व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून या बिबट्याला ठार करण्याची सूचना वन विभागाला देण्याची मागणी आ. काळे यांनी केली. या वेळी झालेले संभाषण थेट आंदोलकांनाही ऐकविले. उपमुख्यमंत्री म्हणाले, की पुणे जिल्ह्यातही बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत पुणे जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांच्या धर्तीवर कोपरगावात उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देणार आहे. बिबटे दिसणाऱ्या सर्व ठिकाणी पिंजरे लावण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी वन विभागाला दिल्या.
सोमवारी ः कोपरगाव शहरापासून दोन किलोमीटरवर मुर्शतपूर शिवारात अनिल बंब यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना सोमवारी सकाळी एका महिलेवर बिबट्याने झेप घेतली. सुरेगाव शिवारात अनिल वाबळे यांच्या शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. दोन्ही ठिकाणी आरडाओरडा झाल्याने बिबट्या पळून गेला आणि दोघी बचावल्या.
दोन दिवसांपूर्वी ः देरडे चांदवड शिवारात जयंत शिलेदार यांच्या वस्तीजवळ रवींद्र पुंजाजी कोल्हे दूध घालण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. ते कसेबसे निसटल्याने बचावले.
येसगाव-टाकळी परिसरातील नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. शासनाकडून तो प्रस्ताव मंजूर होताच त्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्याचे समतले.