

कोपरगाव: तालुक्यातील येसगाव शिवारात शेतात घास कापत असलेल्या शांताबाई अहिल्याजी निकोले (वय ६०, रा. भास्कर वस्ती, कोपरगाव) यांच्यावर सोमवारी सकाळी दहा वाजे दरम्यान नरभक्षक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला असून संतप्त नागरिकांनी नगर–मनमाड महामार्गावर दोन ते अडीच तास रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. दरम्यान माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी नरभक्षक बिबट्याला तातडीने ठार मारण्याची मागणी केली आहे. (Latest Ahilyanagar News)
या आधी बुधवारी टाकळी फाटा परिसरात ऊसतोडणी कामगारांच्या थळावर सुमारे ८.३० वाजता बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुरडी नंदिनी प्रेमराज चव्हाण (रा. तळेगाव, नांदगाव) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सलग दोन हल्ल्यांमुळे टाकळी रोड, टाकळी फाटा व चर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर संतप्त नागरिक व कुटुंबीयांनी मृत महिलेचा आणि चिमुरडीचा मुद्दा उपस्थित करत नगर–मनमाड महामार्गावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत “नरभक्षक बिबट्याला ठार करा, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या दोन–तीन महिन्यांपासून टाकळी परिसरासह खिरडी गणेश, शिंगणापूर, रेल्वे स्टेशन परिसर, अंबिकानगर, चांदगव्हाण, मुर्शतपूर, काटवण व परिसरातील शेती भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी हल्ले होऊन नागरिक जखमी झाले असतानाही ठोस उपाययोजना न झाल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून लहान मुलांना एकटे बाहेर न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिसरातील महिलांनी वाड्यांवरून “सावध राहा, सुरक्षित राहा” असे आवाज द्यायला सुरुवात केली आहे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच वाढत्या बिबट्या दहशतीबाबत वनमंत्र्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून तसेच लेखी स्वरूपात तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र अद्याप परिस्थिती गंभीरच असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दुर्बल व हतबल वनविभाग!
वनविभागाकडे अपुरा मनुष्यबळ, मर्यादित साधनसामग्री आणि पिंजऱ्यांची कमतरता असल्याने परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात अपयश येत आहे. नागरिकांच्या तक्रारी असूनही अनेक ठिकाणी पिंजरे उभारण्यात विलंब होत आहे. इतकेच नव्हे, तर “पिंजरा तुम्ही आणा, बोकड–कोंबडी तुम्ही द्या” असा सल्ला वनकर्मचाऱ्यांकडून नागरिकांना दिला जात असल्याची चर्चा असून यावरून वनविभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
घटनास्थळी आमदार आशुतोष काळे, युवा नेते सुमित कोल्हे तसेच वनविभागाची टीम दाखल झाली असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. “नरभक्षक बिबट्या अजून किती जीव घेणार? शासनाला आणि वनविभागाला कधी जाग येणार?” अशा संतप्त सवालांसह ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच आहे.