Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Corporation Recruitment: अहिल्यानगर महापालिकेतील ४५ पदांची भरती रखडली; टीसीएसला बदलण्याच्या हालचाली

अभियंते, विद्युत पर्यवेक्षकांसह तांत्रिक पदे रिक्त; १८ वर्षांपासून सर्वसाधारण पदभरती नाही

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर महापालिकेतील अभियंते व विद्युत पर्यवेक्षकांसह ४५ पदे भरण्याची प्रक्रिया अद्याप रखडलेलीच आहे. पदभरतीसाठी महापालिकेकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे (टीसीएस) पत्रव्यवहार केला. टीसीएस सुरूवातीला पदभरती घेण्यास ग्रीन सिंग्नल दिला. मात्र, त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. महापालिकेने पाठपुरावा करूनही टीसीएसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता महापालिकेने एजन्सी बदलाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेत गेल्या १८ वर्षांपासून सर्वसाधारण पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. दर वर्षी कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत आणि अग्निशमनसह विविध विभागांत कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता जाणवत आहे. आजमितीला विविध विभागामध्ये बाह्यसंस्थेमार्फत कर्मचाऱ्यांची नेमणूक करून कामकाज चालविले जात आहे.

लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पदभरतीची मागणी होत होती. मात्र, मनपाचा आस्थापना खर्च एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांपेक्षा पुढे जात असल्याने नगरविकास विभागाकडून पदभरतीस परवानगी मिळत नव्हती. विविध अभियंते आणि विद्युत पर्यवेक्षक यांसारख्या तांत्रिक पदांची कमतरता भासत असल्याने दैनंदिन कामकाजात अडथळे येत आहेत. त्यामुळे आस्थापना खर्चाची अट शिथिल करून अत्यावश्यक तांत्रिक पदे भरण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर करून १७६ पदे भरण्यास मान्यता दिली.

दुसरीकडे सातवा वेतन आयोग लागू झाल्याने महापालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे प्रशासनाने भरण्यात येणारी पदसंख्या कमी करून अत्यावश्यक ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला. साधारण दोन वर्षांपूर्वी शासनाने पदभरतीस मान्यता दिल्यानंतर पदांची संख्या कमी करून अभियंता, पर्यवेक्षक व लिपिक अशा ४५ पदांना अखेर मान्यता मिळाली. त्यानंतर पुन्हा विभागीय आयुक्तांकडे समांतर आरक्षण व बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास मान्यता मिळाल्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आणि कराराची प्रक्रिया झाली.

मात्र, महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लागल्याने पदभरती लांबणीवर पडली होती. आता निवडणूक होऊन एक वर्ष होत आले आहे. मात्र, अद्याप पदभरतीच्या कोणत्याही हालचाली नाहीत. प्रशासनाचा टीसीएसकडे पाठपुरवा सुरू असून, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळे आता महापालिकेकडून एजन्सी बदलाच्या हालचाली सुरू आहेत. एजन्सी बदलल्यानंतरच भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, अशी चर्चा आहे.

४५ पदांची होणार भरती

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : १५

  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : ३

  • कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) : १

  • अभियांत्रिकी सहाय्यक : ८

  • विद्युत पर्यवेक्षक : ३

  • लिपिक टंकलेखक : १३

  • संगणक प्रोग्रामर : १

  • पशुधन पर्यवेक्षक : १

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT