

डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना संकटकाळात तत्काळ मदत मिळावी यासठी सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दहा महिन्यात ७८ हजार ३४१ कॉल आले आहेत. त्यात अनेक ठिकाणी गुन्हा घडण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. त्यात महिन्यात सरासरी ७ हजार १२१ तर, दिवसाला २३७ कॉल आहेत. डायल ११२ ला कॉल आल्यानंतर अवघ्या १२ मिनिटांत घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत. पोलिस, वैद्यकीय, अग्निशमनाची एकाच छताखाली मदत मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पूर्वी वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी नागरिकांना वेगवेगळे क्रमांक लक्षात ठेवावे लागत असत आणि संपर्क साधण्यातही वेळ जात असे. मात्र, '११२' या एकच क्रमांकावर कॉल करताच नियंत्रण कक्षातून तात्काळ संबंधित पथकाला संदेश पाठवला जातो. जीपीएस तंत्रज्ञानामुळे तक्रारदाराचे अचूक ठिकाण शोधणे सोपे झाले असून, गस्ती पथके कमी वेळेत घटनास्थळी पोहोचत आहेत.
मारामारी, चोरी, कौटुंबिक वाद, महिलांची सुरक्षा किंवा संशयास्पद हालचाली यांसारख्या घटनांमध्ये पोलिस पथक तातडीने दाखल होत आहे. तसेच, रस्ते अपघात, अचानक उद्भवलेले आजार किंवा गंभीर दुखापतीच्या प्रसंगी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदतीचा समन्वय साधला जात आहे. आग लागणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीची यंत्रणा कार्यान्वित होत आहे.
अनेक घटनांमध्ये वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची उदाहरणे समोर येत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये, ज्येष्ठांमध्ये आणि महिलांमध्ये या सेवेबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. केवळ गंभीर गुन्ह्यांपुरते मर्यादित न राहता, किरकोळ वादांवर वेळीच नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासही या प्रणालीची मोठी मदत होत आहे. अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कक्षात पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, उपनिरीक्षक युनूस सय्यद आणि सुमारे १४ पोलिस अंमलदार काम पाहत आहेत.
काय आहे डायल ११२
संकट काळात डायल ११२ फोन लावल्यानंतर तो फोन थेट मुंबई व नागपूर येथे सेट्रल कार्यालयात जातो. तेथून संबंधित पोलिस पोलिस अधीक्षक कार्यालयात फोन जोडला जातो. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयातून संबंधित पोलिस ठाणे आणि ११२ च्या पथकास संदेश मिळतो. त्यानंतर पथक घटनास्थळी दाखल होते. दरम्यान, जिल्ह्यात डायल ११२ युनिट अधिक सक्षम होण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन विशेष लक्ष देवून आहेत. दर आठवड्याला त्याचा आढावा घेतला जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांनाही ‘११२’चा आधार
जिल्ह्यात डाय ११२ वरून ७ हजार ६९२ ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी घरात हिनत्वाची वागणूक मिळत असल्याची कारणे समोर आली आहे. तर अनेकांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून ११२ ला कॉल केल्याचे समोर आले आहे.
कॉल आणि कारणे
महिला कौटुंबिक त्रास 751, महिलाना त्राससंदर्भात 863, मारहाण 14807, मिसिंग मुले 320, महिला 80, पुरूष 327, प्राणी 23 अन्य स्वरूपाच्याही तक्रारी डायल ११२ वर येत आहेत.
नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी न घाबरता तत्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच या सेवेचा गैरवापर किंवा खोटी माहिती देऊन यंत्रणेचा वेळ वाया घालवू नये. अचूक पत्ता आणि घटनेची थोडक्यात माहिती दिल्यास मदत कार्य अधिक वेगवान होण्यास मदत होते.
तुषार धाकराव, पोलिस उपनिरीक्षक