

नगर: सोयाबीन, मूग आणि उडीद आदी पिकांचा पीक कापणी प्रयोग पूर्ण झाला असून, याबाबतचा संकलित अहवाल कृषी आयुक्त कार्यालयाकडे गेला आहे. त्यामुळे या पिकांच्या पीकविम्याचे पैसे डिसेंबर-जानेवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कापसाच्या पीक कापणी प्रयोगाला आणखी दीड महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे कापसाच्या पैशासाठी मोठा अवधी लागणार आहे.
२०२६-२७ या खरीप हंगामातील भात, बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, मका, भुईमूग, कापूस व कांदा आदी पिकांसाठी जिल्ह्यातील २ लाख ५९ हजार १३८ शेतकऱ्यांनी २ लाख ६६ हजार ५३० हेक्टर क्षेत्रासाठी १४७१ कोटी रुपयांचे पीकविमा संरक्षण घेतलेले आहे.
यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला असून, पीकविमा कधी मिळेल याची प्रतीक्षा लागली आहे. पीकविम्याचे पैसे मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग आणि सॅटेलाईट पाहणी अहवाल महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल मंडलांतील विविष्ट गावांत पिकांची पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. आतापर्यंत सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले असून, शासनाकडे अहवाल पाठविला आहे.
शासन व पीकविमा कंपनी याबाबत निर्णय घेणार असून, या तिन्ही पिकांच्या पीकविम्याचे पैसे लवकरात लवकर डिसेंबर वा जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. बाजरी पिकाचे कापणी प्रयोग पूर्ण झाले. बाजरीबरोबर लवकरच इतर पिकांचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. कापसाची वेचणी जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे. आतापर्यंत कांद्यांचे कापणी प्रयोग ३२ टक्के झाले आहेत. त्यामुळे कापसाच्या पीकविम्याचे पैसे मिळण्यास मोठा अवधी लागणार आहे. भुईमुगाचे ७० टक्के, मक्याचे ९१ टक्के व भाताचे २२ टक्के कापणी प्रयोग झाले असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
‘उंबरठा’पेक्षा कमी उत्पादन आले तरच मदत
अधिसूचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चालू वर्षीचे सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आले तरच विमा नुकसानभरपाई लागू होणार आहे. सोयाबीन पिकांचा सर्वाधिक १ लाख ४० हजार ८२९ हेक्टर क्षेत्रावर विमा उतरविण्यात आला असून, संरक्षित रक्कम ८८० कोटींची आहे. ३५ हजार ७५६ हेक्टरवर कापसाचा विमा उतरविला गेला असून त्याची संरक्षित रक्कम २३२ कोटींची आहे.