Rain Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Rainfall: जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी; नेवासात सर्वाधिक 23.8 मिमी पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा

पहिल्याच सर्वदूर पावसाने 15 हजार हेक्टरवरील पिकांना जीवदान; 90 महसूल मंडलांत पावसाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात मंगळवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. सरासरी ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नेवासा तालुक्‍यात सर्वाधिक २३.८ मिलिमीटर तर नगर, पारनेर व पाथर्डी या तीनही तालुक्‍यांत सरासरी १७.५ मिलिमीटर पाऊस झाला. मान्‍सूनच्‍या पहिल्‍याच पावसाने शेतकर्‍यांच्‍या आशा पल्‍लवीत झाल्‍या आहेत.

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍हा पावसाच्‍या प्रतीक्षेत होता. मंगळवारी (दि.२३) सकाळपासूनच पावसास प्रारंभ झाला. यंदा पहिल्‍यांदाच सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. एकदाचा पावसास प्रारंभ झाल्‍यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्‍या काही दिवसांत पेरणी झालेल्‍या १५ हजार हेक्‍टरवरील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. गेल्‍या दोन महिन्‍यांपासून काहिलीने बेजार झालेल्‍या नागरिकांनाही या पावसाने दिलासा दिला आहे.

मान्‍सूनच्‍या पहिल्‍या पावसाने जिल्ह्यातील जवळपास ९० महसूल मंडलांत हजेरी लावली आहे. जामखेड तालुक्‍यातील खर्डा मंडलात सर्वाधिक ५१.५ तर नेवासा तालुक्‍यातील चांदा, घोडेगाव,वडाळा बहिरोबा, मंडलांत प्रत्‍येकी ४९ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने नेवासा तालुक्‍यातील भूजलपातळीत वाढ होण्‍यास मदत होणार आहे. पहिल्‍याच सर्वदूर झालेल्‍या पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी खरीप पेरणीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

१५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाचे मंडल

नेप्‍ती, नालेगाव, जेऊर, भिंगार, चास, केडगाव, पारनेर, वाडेगव्‍हाण, वडझिरे, निघोज, पळशी, कान्‍हूरपठार, जवळा, अळकुटी, देवदैठण, खर्डा, भातकुडगाव, कोरडगाव, करंजी, मिरी, तिसगाव, चांदा, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, कुकाणा, सोनई, देडगाव, सात्रळ, ताहाराबाबद, ब्राम्‍णवाडा, श्रीरामपूर, राहाता.

जिल्ह्यात फक्‍त ३६ मि.मी. पाऊस

२४ जूनपर्यंत जिल्‍हाभरात ८६.६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्‍त ३५.७ मिलिमीटरची नोंद झाली आहे. खरीप पेरणीसाठी जवळपास सरासरी ८० ते १०० मिलिमीटरची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे पेरणीसाठी दोन तीन मुसळधार पाऊस अपेक्षित असल्‍याचे कृषी विभागाचे म्‍हणणे आहे.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी.)

नेवासा २३.८, अहिल्‍यानगर १७.७, पारनेर, १७.५, पाथर्डी १७.२, शेवगाव १३, जामखेड ११.१, अकोले ९.४, श्रीरामपूर ८.३, राहाता ७.६, राहुरी ५.९, संगमनेर ९.४, श्रीगोंदा ४.२, कोपरगाव ४.१, कर्जत २.६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT