Bjp vs Ncp Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Legislative Council Election: नगर विधान परिषद जागेवर महायुतीत धुसफूस; भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

अजित पवारांच्या निधनानंतर नगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच; भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेच्या हालचालींना वेग

पुढारी वृत्तसेवा

नगर: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांची निवडणूक जाहीर होताच, नगरच्या जागेसाठी हालचालींना वेग आला आहे. अनेक टर्मपासून राष्ट्रवादीकडे असलेल्या नगरच्या जागेवर स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने दावा केला आहे, तर कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडायची नाही, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे शिष्टमंडळ घेऊन निघाले आहेत. याशिवाय, शिंदे शिवसेनेनेही चाचपणी सुरू केल्याने ‌‘महायुती‌’मध्ये धुसफूस सुरू झाल्याचे चित्र आहे.

नगरची जागा ही पूर्वीपासूनच राष्ट्रवादीकडे राहिलेली आहे. गेल्या दोन टर्मपासून अरूण जगताप हेच राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यामुळे या वेळीही ही जागा राष्ट्रवादीकडेच राहील, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांचेही नाव चर्चेत आहे. याशिवाय, राहुल जगताप, घनश्याम शेलार, सचिन जगताप यांचीही नावे स्पर्धेत आणली जात आहे. मात्र, दुसरीकडे भाजपाने नगरची जागा मिळावी, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडेही आग्रही मागणी केली आहे. त्यासाठी संख्याबळाचेही गणित मांडल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेतेही त्यासाठी अनुकूल असल्याचे समजते.

दरम्यान, स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची धुरा आली आहे. त्यांच्या नेतृत्वात नगरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. मित्रपक्ष भाजपाने हक्काच्या नगरच्या जागेवर दावा केल्याने, त्या आपली हक्काची नगरची जागा खरेच सोडतील का, याकडे राज्याचे लक्ष आहे.

तनपुरेंना पहिले प्राधान्य; सुजय विखेंचीही चर्चा

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील माघारीनंतर, कितीही इन्कार केला तरीही प्राजक्त तनपुरे यांची भाजपाशी वाढती जवळीक लपून राहिलेली नाही. त्यामुळे या जागेवर सर्वप्रथम तनपुरेंच्या नावाचीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः त्यांच्यासाठी आग्रही असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याशिवाय डॉ. सुजय विखे पाटील यांचेही पुनर्वसन व्हावे, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. सत्यजित कदम, ॲड.अभय आगरकर, प्रा.भानुदास बेरड यांची नावे चर्चेत आहे.

‌‘झेडपी, पंचायत समिती‌‘चे 89 मतदार कमी

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाच झालेल्या नसल्याने, झेडपीचे 75 सदस्य आणि पंचायत समितीचे 14 सभापती, अशा 89 सदस्यांशिवायच ही निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी महापालिका आणि नगरपालिका, नगरपंचायतींचे अशा 16 संस्थांमधील 461 इतके नगरसेवक हेच मतदार असणार आहेत. विजयासाठी 232 हा जादुई आकडा गाठणारा उमेदवार विजयी ठरणार आहे.

भाजपाकडे 39 टक्के मतदार

जिल्ह्यातील मतदारयादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. प्राथमिक आकेडवारीनुसार, 15 नगरपालिका, नगरपंचायतींपैकी 7 संस्था भाजपाच्या ताब्यात असून, 461 पैकी 179 इतके 39 टक्के मतदार हे एकट्या भाजपाकडे आहेत. त्यामुळे त्यांनी नगरच्या जागेवर दावा केल्याचे समजते.

तरच काँटे की टक्कर; अन्यथा..

जर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झालेच, तर राष्ट्रवादी आणि मविआ, प्रणीत गटांची (तनपुरे-गडाखसह) संख्या 160 पेक्षा अधिक होत आहे. याशिवाय शिंदे शिवसेनेकडेही 43 मतदार नगरसेवक आहेत. वंचित, ठाकरे गट, अपक्ष यांच्याकडेही 67 पेक्षा जास्त मतदार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपाविरोधात सर्व एकत्र आल्यास ही निवडणूक काही प्रमाणात चुरशीची होऊ शकते.

नगरची जागा भाजपालाच मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या संदर्भात पालकमंत्री विखे पाटील यांना कळविण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष तसेच मुख्यमंत्र्यांकडेही मागणी पोहचलेली आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकृत उमेदवार जाहीर करतील.
दिलीप भालसिंग, भाजपा
नगरची जागा पूर्वीपासून राष्ट्रवादीने जिंकलेली जागा आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महायुतीमध्ये त्यांच्या नेतृत्वातील नगरची ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. यासाठी बुधवारी आम्ही सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडेही तशी मागणी करणार आहोत.
कपिल पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
महाराष्ट्रात 17 जागा आहेत. यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला त्या तुलनेत जागा मिळाव्यात, त्यात नगरची जागा आम्हाला मिळावी. यासाठी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची आम्ही शिष्टमंडळाने भेट घेणार आहोत. मी स्वतः निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे.
अरुण मुंडे, शिवसेना नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT