

नगर: आखाती युद्धामुळे वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम दिसू लागले आहेत. यामध्ये इंधनाचीही टंचाई जाणवेल, अशी भीती बाळगली जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील 450 पेट्रोलपंपांवर दररोज वाहनधारकांची गर्दी वाढू लागली आहे. तीन दिवस पुरणारा पेट्रोलचा साठा आता अवघ्या सहा तासांत संपत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काल रविवारी दिवसभरात सुमारे 200 पेक्षा अधिक पंपांवर पेट्रोल संपल्याने ‘नो स्टॉक’ तसेच ‘संपले आहे’ असे फलक झळकलेले दिसले.
जिल्ह्यात 450 पेक्षा अधिक पेट्रोलपंप आहेत. यातील उत्तर जिल्ह्यातील पेट्रोलपंपांना मनमाड डेपोतून, दक्षिणेतील जिल्ह्यांना अकोळनेर डेपो आणि कर्जत, जामखेडसह अन्य काही ठिकाणी पुण्याहून पेट्रोलचा पुरवठा होतो. साधारणतः एका पंपाला 8 हजार लिटरचा टँकर हा तीन दिवस पुरतो. त्यामुळे जिल्ह्यातील 450 पंपांना सरासरी 30 लाख लिटर इंधनाचा साठा मिळतो.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आखाती युद्धामुळे देशासह जिल्ह्यालाही पेट्रोलची टंचाई भासेल, या भीतीने नागरिक गोंधळून गेले आहेत. अनेकजण पेट्रोलपंपांवर वाहनांच्या टाक्या फुल करून घेत आहेत. यातून जे आठ हजार लिटर पेट्रोल तीन दिवस पुरत होते, ते आता सहा ते आठ तासांतच किंबहुना एकाच दिवसात संपत आहे. डेपोवरूनही सर्वांना एकाचवेळी पेट्रोल पुरवणे शक्य नसते. त्यांनाही सात-सात जिल्ह्यांना पेट्रोल पुरवठा करायचा असतो. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी पेट्रोलची मागणी करताना पंपचालकांना थांबण्याशिवाय पर्याय नसतो आणि पेट्रोल येईपर्यंत पंप बंद ठेवण्याची वेळ येते.
सध्या येतो 250 पंपांपुरताच पेट्रोलसाठा
टंचाईच्या अफवेमुळे गोंधळून गेलेल्या वाहनचालकांकडून आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोलचा साठा केला जात असल्याने कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. याच कारणातून मनमाड, अकोळनेर, पुण्याच्या डेपोतून इंधन पुरवठ्यातील साखळीतही बिघाड झाल्याने आजमितीला जिल्ह्यातील 450 पैकी सुमारे 250 पेट्रोल पंपांनाच 18-20 लाख लिटर ऐवढेच पेट्रोल मिळत आहे. हे तीन दिवस पुरेल, अशी अपेक्षा असताना, ते काही तासात संपत आहे. त्यामुळे ही टंचाई तीव्र होताना दिसत आहे.
इंधन टंचाईची भीती बाळगू नका. जिल्ह्यासाठी पुरेसा पेट्रोल साठा मिळतो आहे. मात्र गरज नसताना वाहनांच्या टाक्या भरून घेतल्या जात आहेत. परिणामी, कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. यातून पेट्रोलपंप बंद ठेवावे लागत आहेत. जिल्ह्यात काल साधारणतः 200 पेक्षा अधिक पंपावर शॉर्टेज असल्याचे समजले. नागरिकांनीही जबाबदारीने गरजेपुरतेच इंधन भरून घ्यावे, साठा करू नये.
डॉ. स्वाधीन गाडेकर, जिल्हाध्यक्ष, पेट्रोल डीलर असोसिएशन, अहिल्यानगर